मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी नुकतीच मोठी घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांच्याविरोधात उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात मी लढणार, अशी घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात बाप विरुद्ध बेटा एकमेकांना भिडणार असलयाचे दिसून येत आहे .
या मतदारसंघाचे गजानन कीर्तिकर हे विद्यमान खासदार आहेत. पण त्यांचं तिकीट कापलं जाईल, अशी चर्चा होती. पण आता स्वत: गजानन कीर्तिकर यांनी आपण उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे . कीर्तिकर यांनी घोषणा केल्यानंतर मला या निवडणुकीत लढा असं सांगितलं आहे पण, मी मुलाविरोधात लढलं तर समाजात वाईट मेसेज जाईल असं मी सांगितलं होतं, असंही कीर्तिकर म्हणाले. आता अमोलने मी वडिलांविरोधात लढणार नाही असं सांगायला हवं, असंही गजानन कीर्तिकर म्हणाले आहेत . त्यामुळे आता या मतदारसंघात बाप विरुद्ध बेटा असा सामना रंगणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे . दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा याआधी केली आहे . आता यावरुन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी प्रतिक्रिया दिली आहे . ते म्हणाले , आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना हरवण्यासाठी खासदार गजानन किर्तीकर प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. म्हणजे महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे .
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वायव्य (उत्तर-पश्चिम) मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. कीर्तिकर हे उमेदवारी मिळाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराऐवजी सक्तवसुली संचालनालयाच्या समन्स आणि चौकशीमुळे अधिक चर्चेत आहेत. कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर होताच काही तासांत ईडीने त्यांना समन्स आलं . खिचडी वितरणात कथित गैरव्यवहाराप्रकरणी चौकशीसाठी ईडीने कीर्तिकरांना आज चौकशीसाठी बोलावलं होतं. ईडीने आज सलग सात तास त्यांची चौकशीदेखील केली. आता दुसरीकडे त्यांच्याविरोधात त्यांचे वडील गजानन कीर्तिकर रिंगणात आहेत . त्यामुळे ते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
दरम्यान संजय निरुपम या मतदारसंघावर उमेदवारीसाठी प्रचंड इच्छुक आहेत. पण स्वत: गजानन कीर्तिकर यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्याने आता पिता-पुत्रात थेट लोकसभेच्या निवडणुकीची लढाई होण्याची शक्यता आहे . असं असलं तरी आता अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून गजानन कीर्तिकर यांच्या नावाची चर्चा आहे .