मुंबई : दिल्ली सरकारच्या मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Yashwant Ambedkar)यांनी पंतप्रधान मोदींवर (Narendra Modi ) निशाणा साधला आहे .मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल यांना अटक होऊ शकते तर राफेल विमान खरेदी प्रकरणात नरेंद्र मोदी यांना अटक केली पाहिजे, असं थेट विधान आंबेडकर यांनी केलं आहे . कॅबिनेटचा विषय हा कोर्टाचा आणि चौकशीचा विषय होऊ शकत नाही. त्यामुळे जो न्याय केजरीवालांना लावला तोच न्याय मोदींना लावायला हवा असा हल्लाबोल आंबेडकरांनी चढवला आहे . त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .
दरम्यान महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही यावरून आंबडेकरांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे .राऊत हा महाविकास आघाडीची चुकीची माहिती देत आहे , तो आघाडीत बिघाड करतोय असा आरोप त्यांनी केला आहे . राऊतांनी आघाडीत ठिणगी कशी टाकली हे सांगताना त्यांनी सुभाष देसाईंचं उदाहरण दिलं. महाविकास आघाडीच्या चर्चेत सुभाष देसाई असेपर्यंत सर्व ठीक होतं… पण नंतर कोणाला तरी कुणासाठी वापरायचं असा हिशेब सुरू झाला, या शब्दांत आंबेडकरांनी राऊतांना लक्ष्य केलं. त्याचवेळी आम्हाला फक्त तीन जागांचा प्रस्ताव होता, त्यात अकोला लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
नव्या आघाडीबद्दल बोलताना ते म्हणाले , . 2 एप्रिल रोजी भाजपविरोधी आमच्या नव्या आघाडीची सुरुवात होईल. त्यावेली सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. आमच्यासोबत कोण असेल आणि आम्ही कुणासोबत असू? याची सर्व माहिती 2 तारखेलाच दिली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच आमचे दरवाजे कुणासाठीही बंद झालेले नाहीत. आमचे दरवाजे उघडेच आहे. महाविकास आघाडीसोबतच चर्चा केली पाहिजे असं नाही. आम्ही वैयक्तिक चर्चाही करू शकतो, असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.