Twitter: @NalavadeAnant
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फक्त दिल्लीत पळत असतात. या सरकारला मुंबईची महाराष्ट्राची काळजी नाही त्यांना दिल्ली आणि गुजरातची काळजी दिसते, असा टोला हाणत तोडून मोडून बनलेले हे सरकार महाराष्ट्रासाठी काही करेल असे वाटले होते. पण यांना आमच्यापेक्षा जास्त काळजी गुजरातची लागली आहे, अशा शेलक्या शब्दात युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे फडणवीस यांच्यावर हल्लाबोल चढवला.
कारण याअगोदर वेदांता फॉक्स्कोन, मुंबईतील केंद्र शासनाची अनेक वर्ष मुंबईत असलेली काही महत्त्वाची मुख्यालये गुजरातला पाठवली. अगदी इतके कमी म्हणून की काय वर्ल्ड कपची फायनल मॅचसुध्दा गुजरातला पाठवली आणि आता मुंबईत जो उरला सुरला हिरे बाजार आहे, तो सुध्दा गुजरातला नेला? हे कोणाच्या आदेशाने होते आहे हे सर्वांना माहित आहे, असा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाना साधला.
आता हे सगळं बुलेट ट्रेन येण्याआधी झालेले आहे. मात्र आम्हाला संशयच न्हवे तर खात्री आहे की बुलेट ट्रेनचे काम पूर्ण झाल्यानंतर या सरकारला मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवावे असं वाटेल, असा मार्मिक टोलाही ठाकरे यांनी यावेळी बोलताना लगावला.
शिवसेना नेते, युवासेना अध्यक्ष, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार व प्रसार माध्यमांना सोबत घेऊन लोअर परेल येथील डिलाईल रोड पूलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या सरकारवर घटनाबाह्य या जुन्याच शब्दात हल्लाबोल चढवला.
डिलाइल रोडचं नाव आम्ही डीले रोड करणार होतो. गणपती आगमना दिवशी आम्ही एक बाजू या पुलाची सुरू केली आणि १० नोव्हेंबर पर्यंत दुसरी बाजू सुद्धा पूर्ण होऊन सुरू केली जाईल अशी अपेक्षा असल्याची माहिती सुध्दा ठाकरे यांनी दिली.
अंधेरीतील गोखले पूल का पाडला गेला हा राजकीय स्टंट होता का ? एवढी घाई तो पूल पाडण्यासाठी का केली ? जशी या ब्रिजसाठी रेल्वेने दिरंगाई केली तशीच आता त्या पुलासाठी सुद्धा रेल्वे हातबल झाल्याचा दाखवत आहे. गोखले पुलाचे काम वेळेत पूर्ण होऊ शकत नाहीये. कारण रेल्वे कडून सहकार्य मिळत नसल्याची माहिती असल्याचाही आरोप ठाकरे यांनी केला.
गुरुवारी एका पत्रकार परिषदेत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतल्या प्रदूषणावरुन आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यासंदर्भात विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, जे बीसीसीआयमध्ये बसून मुंबईतली फायनल गुजरातला नेऊ शकतात ते यावर उत्तर देण्याच्या लायकीची आहेत असं मला वाटत नाही. ज्यांना सतत फर्स्टस्ट्रेशन येते, ज्यांना थेरपीची गरज आहे, त्यांना मी उत्तर देत नाही. तसेच ज्यांना पक्षातही किंमत नाही त्यांनाही मी उत्तर देत नाही, अशा शेलक्या शब्दांत त्यांनी शेलार यांच्या विधानाची टर उडविली.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक निवडणुकीत उमेदवार नोंदणीत उध्दव ठाकरे यांच्या गटाने भ्रष्टाचार केल्याचा आरोपही आ.शेलार यांनी करत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती, याकडेही लक्ष वेधले असता ठाकरे म्हणाले की, याच सिनेट निवडणूक निर्णयावरून हे स्पष्ट झाल आहे की हे सरकार निवडणुकीला घाबरत आहे. सिनेटमधील आमच्या ताकदीला हे सरकार घाबरत आहे. कारण मागच्या वेळेच्या पदवीधर निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडी विजयी झाली होती. या युनिटच्या दहा जागांवर सुद्धा आम्ही जिंकणार होतो हेही त्यांना माहीत होतं आणि त्यामुळे या निवडणुका पुढे नेल्या जात आहेत असाही आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
भाजपाच्या कार्यकर्त्यांना माझा प्रश्न आहे की, ज्यांनी पक्षासाठी आंदोलन केली, जे पक्षासाठी काम करत आहेत, त्यांनी विचार केला पाहिजे की, यांच्या कॅबिनेटमध्ये ३० पैकी फक्त सहा मंत्रीच हे मूळ भाजपचे आहेत. अजून कोणालाही कुठलेही महामंडळ दिलेली नाहीत. इतकेच काय भाजपकडे असलेले पुण्याचे पालकमंत्रीपद हे सुध्दा दुसरीकडे गेले आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना नेमकं मिळालं काय ? अशी विचारणा करत, त्यामुळेच सगळ्यात भ्रष्ट कारभार या सरकारचा झालेला आहे, असाही थेट हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच त्यांच्या आझाद मैदानावरील मेळाव्यात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या शब्द दिला आहे. त्यासंदर्भात विचारणा केली असता आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला चढवला. ते म्हणाले की, या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा..? आमच्यासह ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्या सगळ्यांचा त्यांनी विश्वासघातच केला आहे. त्यामुळे असल्या एहसान फरामोश लोकांवर आपण किती विश्वास ठेवायचा ? खरं तर या तिघांमधला जनरल डायर कोण ? याचे उत्तर अजूनही मिळालेला नाही, असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.