X: @ajaaysaroj
मुंबई: सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पेच अजूनही कायमच आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण दादा राणे की राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण भैय्या यावर महायुतीचे घोडे अडले आहे.
काही दिवसांपूर्वीच उद्विग्न मनःस्थितीत किरण सामंत यांनी, नरेंद्र मोदींना पंतप्रधान (PM Narendra Modi) करण्यासाठी, एन डी ए चा आकडा चारसौ पार करण्यासाठी, आपण या मतदारसंघातील दावा सोडत असल्याचे ट्विट केले होते, पण ते नंतर त्यांनी काढूनही घेतले. तर चार दिवसांपूर्वीच मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न नको अशा आशयाचा एक जुना अजित पवार (Ajit Pawar) यांचा व्हिडीओ भैय्याशेठ यांनी स्टेटस वर ठेवला आणि परत चर्चांना उधाण आले. नुकतीच उद्योग मंत्री सामंतांनी भाजपचे राज्यातील सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली, त्यानंतर लगेचच उमेदवारीसाठी इच्छुक असणारे प्रबळ दावेदार किरण भैय्या फडणवीस दरबारी थेट नागपुरात दाखल झाले. माझा अभ्यास शंभर टक्के झाला असून मी फक्त पेपरची वाट बघतोय, असे त्यांनी माध्यमांना सांगितले, व आपली दावेदारी कायम ठेवली. अर्थात, फडणवीस सांगतील ते अंतिम असेल, असे स्पष्ट करायला किरण भैय्या विसरले नाहीत.
गेले दोन टर्म शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्या विजयात उदय व किरण सामंत या दोन्ही भावांचा सिंहाचा वाटा आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात तर सामंत बंधूचेच वर्चस्व आहे. शिवाय कोकणात (Konkan) धनुष्यबाण या निशाणीवर पारंपरिक मतदान होते हे नाकारून चालणार नाही. त्यातच मतदानापर्यंतच्या दिवसांत मुंबईतील बहुतांश चाकरमानी कोकणात सुट्टीसाठी जाईल आणि तो तेथील मतदानावर प्रभाव टाकेल, असा होरा राजकीय पक्षांचा आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी सामंत बंधूंची आहे.
या लोकसभा मतदारसंघात सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण व राजापूर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी दीपक केसरकर, उदय सामंत, नितेश राणे व शेखर निकम हे चार आमदार महायुतीचे आहेत तर राजन साळवी व वैभव नाईक महाविकास आघाडीत आहेत. भाजपचे माजी आमदार विनय नातू , अजित गोगटे व बाळ माने ही राजकीय दृष्ट्या स्ट्रॉंग माणसे भाजपच्या दिमतीला शंभर टक्के उतरलेली आहेत. दिवंगत अप्पा गोगटे यांचे जन्मशताब्दी वर्षे नुकतेच देवगड येथे साजरे करण्यात आले. याप्रसंगी नातू, गोगटे यांच्यासह पालकमंत्री रवींद्र चव्हाण व संपूर्ण मतदारसंघ ज्यांनी पिंजून काढला आहे ते भाजपचे कोकणातील नेते प्रमोद जठार हे आवर्जून उपस्थित होते. केडरबेस शिस्तबद्ध पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता यामुळे भाजप येथे तळागाळापर्यंत पोहचला आहे.
त्यातच अत्यंत आक्रमक असणारे नारायण राणे भाजपकडे असल्याने, ते स्वतः आणि त्यांचे दोन्ही पुत्र, आमदार नितेश व माजी खासदार डॉ. निलेश यांच्यामुळे कोकणात विरोधकांच्या अरे ला कारे करणारे, वेळप्रसंगी भाजप विरोधकांना थेट शिंगावर घेणारे, प्रामुख्याने शिवसेना उबाठा गटाला त्यांच्याच भाषेत उत्तर देणारी एक यंत्रणाच भाजपकडे आली आहे. केंद्रीय मंत्री राणे, आमदार नितेश, पालकमंत्री चव्हाण यांनी खूप मोठया प्रमाणात विकास निधी येथे आणला आहे. ग्राम पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून येथे कोट्यवधी रुपयांची कामं झाली आहेत. या सर्व गोष्टींचा फायदा भाजप उमेदवाराला होणार असल्याने भाजपने या जागेवर आपला दावा ठोकला आहे.
दीपक केसरकर व राणे कुटुंबीय सध्या मैत्रीपूर्ण नात्यात आहे. सामंत बंधू आणि राणे यांच्यात राजकीय मतभेद एकेकाळी होते, मात्र कौटुंबिक संबंध तेव्हाही दोन्ही बाजूंनी जपले गेले. राणेंना उमेदवारी मिळाल्यास, आणि भैय्याशेठ सामंत यांना फडणवीस यांच्याकडून खात्रीशीर राजकीय पुनर्वसन तोडगा मिळाल्यास सामंत बंधूंची ताकद रत्नागिरी मतदारसंघात भाजप बरोबर राहील अशी अपेक्षा आहे. सावंतवाडीत दीपक केसरकर, कणकवलीत खुद्द नितेश राणे महायुतीच्या उमेदवाराला लीड देण्याची पराकाष्ठा करतील. तर राजापूरमधून राजन साळवी आणि कुडाळमधून वैभव नाईक उबाठा गटाचे विनायक राऊत यांना मताधिक्य देण्यासाठी झटतील.
कुडाळात डॉ निलेश राणे यांनी गेली पाच वर्षे मतदारसंघ विधानसभेच्या दृष्टीने पुन्हा बांधला आहे. त्यामुळे वैभव नाईक विनायक राऊतांना कितपत उपयोगी येतात हे निकालाच्या दिवशीच कळेल. त्यातच भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे वैभव नाईक यांच्या वाढणाऱ्या फेऱ्या, विधानसभेपर्यंत नाईकांनाच भाजपमध्ये घेऊन येतील अशीही चर्चा सिंधुदुर्गात सुरू आहे. चिपळूणला शेखर निकम यांचा फायदा महायुतीला होणार आहे. त्यातच उबठाच्या भास्कर जाधव यांच्या राजकीय नौटंकीला चिपळूणकर कंटाळले आहेत, असे येथील नागरिक म्हणतात. एका मंदिरात झालेल्या बैठकीला भास्कर जाधव यांनी वयोवृद्ध गावकऱ्याला केलेली शिवीगाळ असो, की महापुरात गावातील एका महिलेशी आणि इतर गावकऱ्यांशी, थेट उद्धव ठाकरे यांच्यासमोरच केलेली जाधवांची अरेरावीची भाषा असो, या सर्वच गोष्टी माध्यमांमधून संपूर्ण राज्यातील जनतेने बघितल्या आहेत. त्यामुळे जाधवांच्या विरोधात संतापाची एक सुप्त भावना चिपळूणमध्ये दिसते. या सर्व गोष्टींचा फायदा महायुतीला होईल असे बोलले जाते.
महाविकास आघाडीने विनायक राऊत यांचे नामनिर्देशन पत्र भरण्याची तयारी केली असताना महायुतीला मात्र अजून आपला उमेदवार देखील जाहीर करता आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. अर्थात भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या एक एक फेऱ्या संपूर्ण मतदारसंघात झालेल्या आहेत, त्यामुळे महायुती येथे लाखांच्या फरकाने निवडून येण्याची भाषा करत आहे. येणाऱ्या एक दोन दिवसात उमेदवार कोण हे निश्चित झाले की या मतदारसंघातील चित्र एकदम स्पष्ट होईल.