मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दहा जागांपैकी तब्बल आठ जागांवर आघाडी घेत बाजी मारली . या यशानंतर आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानसभेसाठी (vidhansbha )मास्टर प्लॅन तयार केला असून या पार्शवभूमीवर त्यांनी पुण्यामध्ये महत्वाची बैठक घेतली .या बैठकीत त्यांनी पक्षाच्या प्रत्येक खासदाराकडे त्यांच्या मतदार संघात येणाऱ्या विधानसभेच्या जागेची जबाबदारी दिली आहे . यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांच्याकडे विदर्भाची, राजेश टोपे (Rajesh Tope) यांना मराठवाड्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर शिरुरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Ramsing Kolhe) शिव स्वराज्य यात्रेमधून पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे( Supriya sule ) महिला मेळावे घेणार आहेत. त्यामुळे येत्या विधानसभेलाही शरद पवार यांची राष्ट्रवादी गुलाल उधळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
लोकसभेनंतर सध्या राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असून यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आगामी विधानसभेसाठी किती जागांवर आपले शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार? याबाबत चर्चांना उधाण आलं असतानाच आता लोकसभेसाठी कमी जागांवर निवडणूक लढवली , जास्त जागा अपेक्षित होत्या मात्र येत्या विधानसभेसाठी कमी जागा घेतल्या जाणार नाही असं स्पष्ट राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितलं आहे .तसेच त्यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत . यासाठी ते स्वतः मैदानात उतरले असून मतदार संघातील प्रत्येक गावोगावी ते दौरे करत आहेत .त्यांनी कालच आगामी विधानसभा निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत पक्षाची नवी फौज तयार केली आहे .तर दुसरीकडे मुंबईमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही बैठकांचा धडाका सुरू केला आहे . त्यामुळे महायुतीचे डोकेदुखी वाढणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
दरम्यान,लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसने स्वबळाची भाषा केली. लोकसभेत शरद पवार गटाने 10 जागापैकी 8 जागा जिंकल्या. तर ठाकरे गटाने 21 पैकी 9 आणि काँग्रेसने 17 पैकी 13 जागांवर यश मिळवले आहे. यात शरद पवार गटाचा सर्वात जास्त 80 टक्के स्ट्राईक रेट राहिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार गट जास्त जागांचा आग्रह करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.