मुंबई : जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उन्मेश (Unmesh Patil) पाटील गेल्या काही दिवसांपासून भाजपवर (Bharatiya Janata Party )नाराज असल्याच्या चर्चाना जोर आला आहे . आता ते लवकरच ठाकरे गटात (Shiv Sena Uddhav Thackeray) प्रवेश करून शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा रंगली आहे. यासाठी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भाजप खासदार थेट मातोश्रीवर पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महायुतीच्या माध्यमातून भाजपने जळगाव मतदारसंघावर दावा केला असून उन्मेष पाटील यांचं तिकीट कापून तेथे स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवर उन्मेश पाटील यांनाच पुन्हा संधी देण्यात येणार अशी शक्यता होती. मात्र, भाजपने आयत्या वेळी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे.या मतदारसंघात 19 लाख 25 हजार 352 मतदार आहेत. यामध्ये 9 लाख 16 हजार 470 महिला मतदार तर 10 लाख 8 हजार 818 पुरुष मतदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपचे उन्मेश पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला होता. भाजपच्या उन्मेश पाटीलांनी राष्ट्रवादी काँग्रेस गुलाबराव देवकर यांच्या दुहेरी मताधिक्याने दणदणीत पराभव केला होता. आता मात्र त्यांना उमदेवारी न मिळाल्याने ते भाजपवर नाराज आहेत .यामुळे ते पत्नीसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे .तसेच लवकरच त्यांच्या पत्नीलाही ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात येणार आहे. दरम्यान उन्मेश पाटील यांच्यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देताना सांगितलं की, ते आमच्या पक्षात प्रवेश करणार का नाही ते माहित नाही, पण त्यांनी वेळ मागितली आहे. आता या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते, हे येत्या काही दिवसात समोर येईल.
दरम्यान उन्मेश पाटील यांनी भांडुपमधील संजय राऊत यांच्या मैत्री निवासस्थानी भेट घेतली. तसेच जळगावचे शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांचीही त्यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे .त्यांच्यासोबत पारोळाचे भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार होते . या भेटीनंतर आता उन्मेष पाटील काय भूमिका जाहीर करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .