पुणे- लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झालीय. त्यात बारामती या लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळतोय. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील अनेक सदस्य घराबाहेर पडताना पाहायला मिळतायेत. अशात अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी दोन दिवसांपूर्वी अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वाद घातल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर बारामतीच्या खासदजार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना पोलीस सुरक्षा द्यावी, अशी मागणी पुण्याच्या पोलीस अधीक्षकांकडे केलीय.
सुप्रिया सुळेंचं पोलीस अधीक्षकांना पत्र
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान दोघांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी सुप्रिया सुळेंची या पत्रातून केली आहे. प्रचारादरम्यान रोहित पवार आणि युगेंद्र पवारांना दडपशाहीचा सामना करावा लागत असल्याचा आरोपही या पत्रात सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
या दोन्ही नेत्यांना घेराव घालत दोघांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आलाय. रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीवाला धोका असल्याचं लिहित, तातडीने पोलीस सुरक्षा पुरवण्याची सुप्रिया सुळे यांनी मागणी केली आहे.
बारामतीत पवार विरुद्ध पवार संघर्ष
बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी निवडणूक होणार आहे. त्यासाठी प्रचाराला सुरुवातही झाली आहे. त्यात अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हेही राजकारणात उतरलेले दिसतायेत. सोशल मीडियावर एक्टिव्ह असणारे युगेंद्र पवार सुप्रिया सुळेंचा प्रचार करताना दिसतायेत. त्यांनी अजित पवारांबाबत केलेल्या एका पोस्टवरुन दोन दिवसांपूर्वी त्यांना काही तरुणांनी जाब विचारला होता. त्यानंतर पवार कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं सांगण्यात येतंय.