मुंबई : महायुतीमधील वादामुळे सध्या माढा लोकसभा(Madha LokSabha) मतदारसंघ भलताच चर्चेत आला आहे.महाविकास आघाडीकडून या मतदारसंघासाठी उमेदवारी असेलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar)हे महायुतीत सामील झाले आहेत . त्यामुळं आता महाविकास आघाडीवर नवा उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. शरद पवार (Sharad Pawar)आता येथे कोणता डाव टाकतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.आहे. दरम्यान जानकर हे महायुतीसोबत जाताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रघुनाथ पाटील(Raghunath patil )यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
माढा मतदारसंघ हा सोलापूर आणि सातारा अशा दोन्ही जिल्ह्यात पसरलेला आहे. साताऱ्यातही शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. तर, सोलापूर भागात धनगर समाजाचे मतदार मोठ्या संख्येनं आहेत. हे लक्षात घेऊन पवारांनी जानकर यांच्याशी चर्चा सुरू केली होती. मात्र, ते महायुतीच्या गोटात गेले आहेत. तिथं रणजितसिंह निबाळकर यांना माघार घ्यायला लावून जानकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे महाविकास आघाडीत नाराजीचा सूर पसरला आहे.
दरम्यान रघुनाथ पाटील हे सांगोल्याचे माजी आमदार व शेकाप नेते गणपतराव पाटील यांचे शिष्य आहेत. शरद पवारांचे ते विश्वासू कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर धनगर समाजात कार्यरत असलेल्या यशवंत सेनेचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. गेल्या २० वर्षांपासून ते धनगर समाजात काम करत आहेत. दरम्यान महायुतीनं जानकर यांना रिंगणात उतरवल्यास शरद पवारांकडून पाटील यांना चाल दिली जाऊ शकते. तसं झाल्यास धनगर मते महाविका आघाडीकडे खेचता येतील. त्याशिवाय, शरद पवारांना मानणारी मराठा मतंही पाटील यांच्या पारड्यात पडू शकतात, असाही एक अंदाज बांधला जात आहे.
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी होत आहे. या बैठकीत वादग्रस्त जागांवर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यानंतर उद्यापर्यंत महाविकास आघाडीचे सर्व पत्ते उघड होतील अशी अपेक्षा आहे. त्यात माढ्यातून कोणाचं नाव असेल याबाबत उत्सुकता आहे.