मुंबई- बीडमधून बजरंग सोनवणे आणि भिवंडीतून सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, आता सातारा आणि माढ्याबाबत शरद पवार काय निर्णय घएणार याची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाबाबत आज किंवा उद्या निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात येतंय. साताऱ्यात भाजपा आणि उदयनराजेंना आव्हान उभं करण्याच्या प्रयत्नात शरद पवार असल्याचं सांगण्यात येतंय.
साताऱ्यातून कुणाला संधी
साताऱ्यात उदयनराजे हे भाजपाच्या कमळ चिन्हावर लढतील अशी शक्यता आहे. ही जागा अजित पवारांच्या वाट्याला गेली होती. मात्र या जागी कमळ चिन्हावर लढण्याचा आग्रह उदयनराजेंनी धरला. दिल्लीत जाऊन अमित शाहा यांची भेट घेऊन उमेदवारीवर शिक्कामोर्तब करुन ते परतले आहेत. साताऱ्याची जागा भाजपाला देऊन नाशिकची जागा अजित पवारांना देण्यात येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शरद पवार हे महायुतीसमोर आव्हान उभं करण्याची शक्यता आहे.
विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील निवडणूक लढणार नाहीयेत. त्यामुळं या मतदारसंघातून नव्या उमेदवाराचा शोध सुरु आहे. यात शशिकांत शिंदे, सत्यजीत पाटणकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. चव्हाण यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यावर सहमती दर्शवलेली आहे. अशात आता पवार कुणाला संधी देतात हे पहावं लागणार आहे.
माढ्यातून कोण उमेदवार
माढा लोकसभा मतदारसंघात रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपानं दुसऱ्यांदा संधी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीला भाजपातूनच विरोध होतोय. अकलूजच्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी अपक्ष प्रचाराला सुरुवात केलेली आहे. त्यांना राष्ट्रवादीत घेऊन रणजीतसिंहांसमोर पवार आव्हान उभं करण्याची शक्यता आहे. फलटणचे रामराजे निंबाळकर हे अजित पवारांसोबत असतानाही, तेही रणजीतसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीवर नाराज आहेत. मोहिते पाटील घराणं आणि रामराजे यांच्या ताकदीचा फायदा घेत माढ्यात भाजपासमोर पवार आव्हान उभं करण्याच्या तयारीत आहेत.
आज किंवा उद्या दिवसभरात धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश होऊन त्यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचाः‘9 तारखेला शीवतीर्थावर या, मला तुमच्याशी बोलायचंय’, राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेत काय?