X: @ajaaysaroj
मुंबई: तो बाहेर येतोय, तो अंडरवर्ल्डचा हिंदू डॉन आह, ही पदवी त्याला थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनीच दिली आहे, ज्याची दगडी चाळ म्हणजे जणूकाही अभेद्य किल्लाच, त्याचा नवरात्रोत्सव म्हणजे टॉक ऑफ द टाऊन, हो तोच ज्याला त्याचे खासलोक प्रेमाने डॅडी बोलतात, ज्याच्याकडे “चुकीला माफी नाही” असे बोलले जाते, तोच अरुण गवळी तुरुंगातून बाहेर दगडी चाळीत येतोय अशी बातमी आहे. पण ऐन निवडणुकीच्या धामधुमीत त्याचे बाहेर येणे ही एक कायदेशीर प्रोसिजर आहे की राजकीय खेळी याची चर्चा त्यानिमित्ताने राज्यभर सुरू झाली आहे. कारण त्याचे येणे कोणाच्या राजकीय फायद्याचे आहे याची गणितं आता मांडली जाऊ लागली आहेत.
तुमचा दाऊद तर आमचा गवळी, असे थेट जाहीर सभेत शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उपस्थित लाखोंच्या जनसमुदायासमोर बोलले आणि त्या क्षणापासून अंडरवर्ल्डवर सत्ता गाजवणारा डॉन अरुण गवळी हिंदूडॉन झाला. त्याचा पक्ष अखिल भारतीय सेनेने, जय शंभो नारायण हे वाक्य म्हणजे त्यांच्या साम्राज्याचे ब्रीदवाक्य केले. गेली कित्येक वर्षे अविरत सुरू असलेला दगडी चाळीचा नवरात्रोत्सव हा लाखो भाविकांचा भक्तीचा विषय फार पूर्वीपासूनच आहे. अक्षरशः संपुर्ण राज्यातील भाविक या नऊ दिवसांत येथे दुर्गेच्या दर्शनाला येतात. पण डॅडीचा शिस्तबद्ध कारभार इतका की आजतागायत इथे कधी भक्तांना मारहाण झाली नाही, कधी या उत्सवात चुकीची गोष्ट घडली नाही की भाविकांना कधी त्रास झाला नाही. त्यामुळे हिंदुत्वाचा गजर दगडी चाळीत पहिल्यापासून आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये. पण यासगळ्याला एक काळी किनार देखील आहे ती गवळीच्या माफिया साम्राज्याची. संघटित गुन्हेगारी, खंडणी, धाकदपटशाही, अपहरण, खून असे अनेक गुन्हे गवळी आणि त्याच्या लोकांवर विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.
त्यातील एक गाजलेले प्रकरण म्हणजे २ मार्च २००७ ला, मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची झालेली निर्घृण हत्या. जामसंडेकर यांचा सदाशिव सुर्वे यांच्या बरोबर एका प्रॉपर्टी वरून वाद सुरू होता. हा वाद इतका टोकाला पोहचला की सुर्वेने गवळीला हस्तकांच्या मदतीने सुपारी दिली. गवळीने हे काम वाजवायला प्रताप गोडसेला सांगितले. गोडसेने यासाठी श्रीकृष्ण गुरव याच्या मदतीने विजय गिरी व नरेंद्र गिरी याला प्रत्येकी अडीच लाख रुपयांची सुपारी दिली. या दोघांनाही प्रत्येकी वीस हजार रुपये आगाऊ रक्कम देण्यात आली. जामसंडेकर यांच्या राहत्या घराची आणि त्या संपूर्ण विभागाची रेकी करण्यात आली व २ मार्च २००७ ला कमलाकर यांचा खून करण्यात आला. या प्रकरणात अरुण गवळी याला अटक झाली. कोर्टात केस सुरू झाली आणि त्याला जन्मठेप सुनावण्यात आली.
इतरही काही केसेस गवळीवर होत्या, त्यामध्ये देखील जन्मठेपेची शिक्षा त्याला ठोठावली गेली. २००७ पासून गवळी त्याची जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. म्हणजे आतापर्यंत त्याची जवळपास १६ वर्षे शिक्षा भोगून झाली आहे. शासन निर्णय २००६ प्रमाणे, वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेला, १४ वर्षे तुरुंगवास पूर्ण झालेला, निम्मी शिक्षा भोगलेला, असा कैदी असेल तर त्याला सूट मिळते. अरुण गवळी १६ वर्षे तुरुंगवासात आहे , त्याच्या वयाची ६९ वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यामुळे तांत्रिक दृष्टीने शासन निर्णयाच्या अधीन राहून त्याने न्यायालयाकडे आपल्याला सोडून देण्यात यावे अशी मागणी केली होती. नागपूर खंडपीठात यावर रीतसर सुनावणी झाली व निर्णय राखून ठेवण्यात आला होता. मात्र दोन दिवसांपूर्वीच नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला आदेश देऊन चार आठवड्याचा अवधी देऊन या अवधीत गवळी यास मुक्त करण्याचे आदेश दिले आणि राज्यात या निर्णया मागील हेतूंची चर्चा सुरू झाली.
राजकीय दृष्टीने बोलायचे झालेच तर, २००४ साली गवळीने दक्षिण – मध्य मुंबई मधून लोकसभेची जागा अखिल भारतीय सेना या त्याच्याच पक्षाकडून लढवली होती. त्याच्या विरोधात तेव्हा त्याचा भाचा सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तर शिवसेनेकडून पाच वेळा खासदार राहिलेले मोहन रावले हे उमेदवार होते. या निवडणुकीत गवळीला तब्बल ९२,२१० तर त्याचा भाचा सचिन अहिर याला १,०६,३४८ एवढी मते मिळाली होती. निवडून आलेल्या रावले यांना १,२८,५३६ एवढीच मते पडली होती जी, अहिर आणि गवळी यांच्या एकत्रित मतांच्या बेरजेच्या जवळपास ७०,००० मतांनी कमी होती. रावलेंचा विजय हा जेमतेम २२,००० मतांनीच झाला होता.
हा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आणि दक्षिण मुंबई मतदारसंघ हे दोन मतदारसंघ असे आहेत की जिथे असणाऱ्या अनेक पॉकेट्समध्ये अरुण गवळीचा दबदबा आजही आहे, त्याचप्रमाणे ईशान्य मुंबई मतदारसंघातही, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग परिसरात त्याला मानणारा वर्ग आहे. प्रामुख्याने वरळी, भोईवाडा, शिवडी, लालबाग, परेल, भायखळा, माझगाव, करिरोड, सात रस्ता, आग्रीपाडा, नागपाडा, लाल विटांची चाळ, तेजुकाया मॅनशन, बकरी अड्डा, एस ब्रिज या सर्व परिसरात अजूनही असलेला मराठमोळा मतदार आणि काही प्रमाणात व्यापारी वर्ग देखील गवळीला मानतात. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर गवळीचे तुरुंगातून बाहेर येणे याला एक राजकीय रंग प्राप्त झाला आहे.
निवडणुकांच्या तोंडावर, त्या धामधुमीत जेंव्हा अशी एलीमेंट्स ऍक्टिव्ह होतात, तेंव्हा त्यामागे सत्ताधारी पक्षाची राजकीय गणितं असतात असा एक सर्वसाधारण समज आहे. हे कितपत खरं आहे, यात किती तथ्य आहे, हे येणाऱ्या पुढील वर्षभराच्या कालावधीत स्पष्ट होणार आहे. कारण लोकसभेनंतर लगेच वर्षभरात विधानसभा निवडणुका होतील आणि सर्वात प्रतिष्ठेच्या ठरणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुका देखील लगेच होतील. तेव्हा आज घडणाऱ्या घटना या सगळ्या क्रोनोलॉजीच्या उलगडा करणाऱ्या ठरणार आहेत.