By सचिन उन्हाळेकर
X : Rav2Sachin
मुंबई
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकऱ्यांपैकी एक समजले जाणारे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची मुंबई महानगरालिका आयुक्त पदी वर्णी लागणार आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गगराणी यांची मुंबई महानगरालिका आयुक्तपदी वर्णी लावणे हा याच रणनीतीचा भाग म्हणून पाहिले जात आहे. विद्यमान आयुक्त डॉ. आय एस चहल हे १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. आयुक्त म्हणून मुंबई महापालिकेत येण्याआधी ते नगरविकास खात्याचे प्रधान सचिव होते.
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाची लाट असतानाच्या कठीण काळात मे २०२० मध्ये चहल यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली होती. मुंबईतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना राबवल्या. महापालिकेच्या सर्व यंत्रणांना कामाला लावून कोरोना आटोक्यात आणला. चहल यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेने धारावीत राबवलेला कोरोना विरुद्धच्या लढाईचा पॅटर्न जगभर गाजला होता.
याच दरम्यान, आयुक्त म्हणून काम पाहणाऱ्या चहल यांचे शिवसेना नेतृत्वाशी उत्तम सूर जुळले होते, असे म्हटले जाते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे विश्वासू अधिकारी अशी त्यांची ओळख बनली होती.
हे लक्षात घेता निवडणुकीआधी चहल यांच्या जागी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील भूषण गगराणी यांची मुंबई महानगरालिका आयुक्त पदी वर्णी लागणार आहे, अशी चर्चा आहे. येत्या काही दिवसात भूषण गगराणी हे मुंबई महापालिकेचे आयुक्त पद स्विकारतील, असे ही मंत्रालयातील सूत्रांकडून सांगितले जात आहे.
मुंबई महानगरालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना साडे तीन वर्षांहून अधिक काळ झालेला आहे. मध्यतंरी भारत सरकारचे सचिव या पदासाठीच्या निवड श्रेणी यादीत समावेश झाल्याची माहिती चहल यांनी स्वतःच सोशल मीडियावर शेअर केली होती.
मुख्मंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केल्याच्या वीस दिवसांनी 1990 बॅचचे आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांना मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख सचिव बनविले होते. मुख्यमंत्री सचिवालयामधील ही सर्वात मोठी नियुक्ती होती. महाविकास आघाड़ी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपा सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव या स्वरूपात गगराणी यांनी काम केले होते.