विश्लेषण ताज्या बातम्या

मिलिंद नार्वेकर घेणार माघार? एमसीएच्या अध्यक्षपदाची ऑफर!

X : @vivekbhavsar

मुंबई

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत 12 उमेदवारांनी नामांकन भरल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता वाढली आहे. प्रत्यक्ष मतदान झाल्यास मतांची फाटाफूट होऊन शेकापचे जयंत पाटील (PWP leader Jayant Patil) किंवा अजित पवार (Ajit Pawar) गटाचा एक उमेदवार यापैकी एकाचा पराभव निश्चित आहे. हे टाळण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. बहुजन विकास आघाडी (BVA) किंवा काँग्रेस (Congress) यांची मते उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराकडे वळती न झाल्यास उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) नाचक्की होऊ शकते आणि म्हणूनच मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना आज माघार घ्यायला लावायचे आणि त्याबद्दल त्यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) रिक्त झालेल्या अध्यक्ष पदावर वर्णी लावायची, असा पर्याय पुढे आल्याची खात्रीलायक माहिती आहे. 

विधान परिषदेच्या 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत अशीच मतांची फाटाफूट होऊन काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP – SP)  हेच प्रयत्नशील असल्याचे समजते. विरोधी पक्षातील छोट्या पक्षांना राजकीयदृष्ट्या जगवणे गरजेचे आहे, अशी भूमिका शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतली असून त्यासाठीच शेतकरी कामगार पक्षाचे (Peasants and Workers Party) जयंत पाटील यांना निवडून आणण्यासाठी पवारांनी कंबर कसली आहे. पवारांनी काँग्रेसचे नेते तसेच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचेही सांगण्यात येते, मात्र या माहितीला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दावा केला आहे की, महायुतीचे सर्व नऊ उमेदवार निवडून येतील, एवढी मतसंख्या त्यांच्याकडे आहे. एकूण 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असून त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे दोन उमेदवार आहेत तर भाजपने (BJP) पाच उमेदवार उभे केले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे तर काँग्रेसने (Congress) प्रज्ञा सातव आणि शिवसेनेने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. 

भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर यांना उमेदवारी दिली आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे उमेदवार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कृपाल तुमाने आणि भावना गवळी या दोघांना उमेदवारी दिली आहे. 

भाजपकडे स्वतःचे 103 मते आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे स्वतःची 39 आणि दोन अपक्ष असे 41 मते आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे 38 मत आहेत. याशिवाय प्रहार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज्य आणि अपक्ष यांची गोळाबेरीज केली तर महायुतीकडे १९९ मते असल्याचे दिसून येत आहे. 

दुसरीकडे महाविकास आघाडीच्या (Maharashtra Vikas Aghadi) मतांची बेरीज 73 होते आहे. यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 13, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आणि काँग्रेसच्या 37 मतांसह समाजवादी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, शेकाप आणि शंकराव गडाख यांची क्रांतिकारी शेतकरी संघटना तसेच बहुजन विकास आघाडी (Bahujan Vikas Aghadi) यांच्या मतांचा समावेश आहे. 

सात आमदार लोकसभेवर निवडून गेले आहेत. एकाचा राजीनामा तर दोन आमदारांचे निधन आणि अन्य कारणांमुळे पात्र मतदारांची संख्या २८८ वरून २७४ वर आली आहे. उमेदवार निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित झाला आहे. सत्ताधारी पक्षातील एका नेत्याने दावा केला की बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी किंवा शेकाप आणि एम आय एम या पक्षांची मते महाविकास आघाडीलाच मिळतील याबद्दल खात्रीने सांगता येणार नाही. गुप्त मतदान असल्याने सहसा सत्ताधारी पक्षाच्या बाजूनेच मतदान होते, त्यामुळे ही मते फुटण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा उमेदवार राजेश विटेकर किंवा शेकापचे जयंत पाटील यापैकी एकाचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे.

शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांचे सर्व पक्षात मधुर संबंध असल्याने ते दुसऱ्या पसंतीच्या मतांचा कोटा मिळवण्यात यशस्वी होऊ शकतील, मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला काँग्रेसची शिल्लक राहिलेले मते मिलिंद नार्वेकर यांनाच मिळतील याची देखील खात्री देता येणार नाही. शेतकरी कामगार पक्ष हा छोटा परंतु महत्त्वाचा पक्ष आहे आणि त्याचे राजकीय अस्तित्व असणे शरद पवार यांना गरजेचे वाटते आहे, म्हणूनच ते जयंत पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा दावा एका नेत्याने केला. 

काँग्रेसचा पुरेसा कोटा असल्यामुळे प्रज्ञा सातव सहज निवडून येतील, जयंत पाटलांसाठी शरद पवारांनी फिल्डिंग लावली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतील तिसरा उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनीच माघार घेऊन ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी,  यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी मिलिंद नार्वेकर यांची वर्णी लावायची आणि त्यांना या निवडणुकीतून माघार घेण्यास लावून निवडणूक बिनविरोध करावी, असा प्रस्ताव पुढे आला आहे. अमोल काळे यांच्या अकाली निधनाने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. एम सी चे अध्यक्ष पद हे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाते, त्यामुळे शिवसेनेने अर्थात नार्वेकर यांनी देखील हा पर्याय स्वीकारल्याचे समजते आणि आज दुपारी तीन वाजेच्या आत नार्वेकर माघार येथील आणि 11 जागा बिनविरोध निवडून येतील, असा दावा सेनेतील एका नेत्याने केला.

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
विश्लेषण महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नवाबांसाठी अजित पवारच (म)मालिक?

@vivekbhavsar मुंबई मनी लॉन्ड्रीग आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी असलेल्या कथित संबंधामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी