महाराष्ट्र ताज्या बातम्या

३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त रायगडावर दाखल; जयघोषाने दुमदुमला गड

लाखो शिवभक्त ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड किल्ल्याकडे जाताना; भगवे ध्वज आणि उत्साहपूर्ण वातावरण.

देश-विदेशातून शिवप्रेमींची रायगडावर गर्दी; संभाजीराजे आणि शहाजीराजे यांच्या उपस्थितीत आज ऐतिहासिक सोहळाBy Milind Mane

महाड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर लाखो शिवभक्तांनी गर्दी केली असून संपूर्ण गड परिसर शिवमय झाला आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय लोकोत्सवाला राज्यासह देश-विदेशातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.

६ जून १६७४ रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. या ऐतिहासिक घटनेची स्मृती जपण्यासाठी दरवर्षी ५ आणि ६ जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते. गेल्या काही वर्षांत या उत्सवाला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले असून यंदाही लाखो शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली आहे.

यावर्षीचा सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत आहे. गडावर आलेल्या शिवभक्तांमुळे रायगड परिसर उत्साहाने फुलून गेला असून “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.

सोहळ्यात तलवारबाजीचे प्रात्यक्षिक, ‘जागर शिवशाहिरांचा’, पालखी सोहळा, ध्वजपूजन, शाहिरी कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन हे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. त्यानंतर मुख्य शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे.

लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीमुळे प्रशासनाने पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, स्वच्छतागृहे आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रायगड परिसरात अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून हजारो शिवभक्तांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज आहे.

यामध्ये २५० होमगार्ड, १,४४३ पोलीस कर्मचारी, १४५ पोलीस अधिकारी, ५ बॉम्ब शोधक व नाशक पथके, १ एसआरपी प्लाटून, २ आरसीपी पथके आणि १ क्यूआरटी पथक तैनात करण्यात आले आहे.

वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी कोंझर येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी एसटी महामंडळाने विशेष बससेवा उपलब्ध करून दिली आहे. महाड आगारामार्फत १२५ एसटी बसेस तैनात करण्यात आल्या असून माणगाव आणि रोहा आगारातून आणखी २५ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती महाड आगार प्रमुख रितेश फुलपगारे यांनी दिली.

एकंदरीत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५२ व्या वर्धापनदिनानिमित्त रायगडावर अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण असून इतिहास, परंपरा आणि शिवभक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे.

Milind Mane

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात