X : @NalavadeAnant
मुंबई: देशभरात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरीही महाराष्ट्रात मात्र जागावाटपावरून अजूनही काही जागांवरून आघाडी व महायुतीमध्ये निर्माण झालेला घोळ अजूनही संपण्याचे नाव घेत नाही.
त्याचे कारण महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी व उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघावरून वाद सुरू झाले. सांगली लोकसभा मतदारसंघात उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेने मित्र पक्षांना विचारात न घेता परस्पर उमेदवार घोषित केल्याने काँग्रेसमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या मतदारसंघात काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याने उध्दव ठाकरे यांनी हि जागा यंदा काँग्रेसला सोडावी असे मानणाऱ्या एका आग्रही गटाने पक्षात उचल घेतली आहे. मात्र त्यात मजेशीर गोष्ट म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, हि जागा सीट वाटपात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्याने तिथे त्यांच्या पक्षाने उमेदवारी लढवावी असे काहीसे जाहीरपणे आपले मत मांडले आहे.
काहीही असले तरी आज घडीला जाहीर केलेल्या जागेवरून उध्दव ठाकरे माघार घेण्याची कोणतीही शक्यता आज तरी सुतराम दिसत नाही. आता जी गत महाविकास आघाडीत आहे तसाच काहीसा पेच महायुतीमध्ये रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, कल्याण, पालघर, सातारा व नाशिक या चार जागांवरून निर्माण झाला आहे. ठाणे या परंपरागत मतदारसंघावर यावेळी मित्र पक्ष भाजप नेत्यांनी उभा दावा केला आहे. तीच गत रत्नागिरी – सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाची आहे. येथेही भाजपने आपला दावा केला आहे. ठाणे मतदारसंघात भाजपने गेल्या वर्ष – दिड वर्षापासून खालपासून वरपर्यंत सगळी यंत्रणा चोखपणे राबवली आहे. त्यातच रत्नागिरी – सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अलर्ट मोडवर ठेवले आहे. त्यामूळे महायुतीमध्ये असलेल्या शिवसेना पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्वपक्षाच्या खासदार व मित्रपक्षांचा प्रचंड दबाव आहे. केवळ या आग्रहापोटी दोन्ही पक्षातील जागावाटपाचा घोळ काही संपण्याचे नाव घेत नाही. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की, अजुनी घोळ संपत नाही.