मुंबई – लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता राज्यात सुरु आहे. अशा स्थितीतही मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्याचा वार राजकीय बैठकांसाठी होत असल्यानं याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी विचारणा केलेली आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि विशेष कार्यअधिकारी यांना याबाबत नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी स्पष्टीकरणानंतर पुढची कारवाी करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलीय.
कोणी केली होती तक्रार
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी याप्रकरणाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा वापर हा राजकीय बैठकांसाठी कसा होऊ शकतो, असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केलाय.
मुख्यमंत्र्यांच्या उत्तराकडं लक्ष
महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होताना दिसतायेत. त्याचबरोबर अनेक नाराज पदाधिकारीही वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येतायेत. अनेकांना तर काही तास वेटिंगवंरही राहावं लागतंय. अशात आता वर्षावर बैठका झाल्या नाहीत तर त्यासाठी दुसरे ठिकाण ठरवण्यात येईल, अशी शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या नोटिशीलाही मुख्यमंत्री काय उत्तर देणार, हे पाहावं लागणार आहे.