मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Loksabha Constituency) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी आज भाजपडकून निश्चित करण्यात आली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्या उमेदवारीवर टीका केली आहे . सातारा लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाल्याचे सांगत ते दिल्लीत जाऊन ‘तिकीट द्या, तिकीट द्या’, अशी मागणी सारखे करत होते. ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला फारशी आवडणारी नाही अशी टीका त्यांनी केली आहे . आता त्यांच्या या टीकेला भाजप काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्याविरुद्ध उदयनराजे भोसले निवडणुकीच्या मैदानात आहेत. काही दिवसांपूर्वी या मतदारसंघात आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे दिल्लीत तीन दिवस तळ ठोकून होते . त्यांनी यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट देखील घेतली होती . आज अखेर त्यांना या मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली . यावरून बोलताना राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड म्हणाले , “छत्रपतींची कोल्हापूरची गादी असो कि सातारची.. आम्हाला ह्या गाद्यांविषयी आदर आहे. महाराष्ट्राला एक परंपरा आहे. आपण कोणासमोर झुकत आहोत याचा विचार उदयनराजे यांनी केला पाहिजे होता . छत्रपतींच्या वंशजांनी हि गादी आचारविचारांचे पालन करून चालवली पाहिजे. पण उदयनराजे यांची कृत्ये – दुष्कृत्ये सगळीकडेच बघितली आहेत. त्यांनी याचा विचार करायला पाहिजे होता असा टोला त्यांनी लगावला आहे .
दरम्यान या मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे शशिकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याबाबत बोलताना आव्हाड म्हणाले, “शशिकांत शिंदे अत्यंत गरीब घरातून आलेला माणूस आहे. त्याची घरची परिस्थिती काय होती हे राजेंनाही माहीत आहे. शरद पवारांनी कायम ज्याच्याकड़े नेतृत्व करायची ताकद आहे त्याला पुढे केलं आहे. शशिकांत शिंदेनी अशा पार्श्वभूमीवर राजेंना अंगावर घेतल आहे. त्यामुळे खरा रयतेचा प्रतिनिधीं शशिकांत शिंदे आहे.”असे म्हणत आव्हाडांनी उदयनराजेंना डिवचलं आहे . आता या मतदारसंघात बाजी कोण मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .