मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha) जागेवरून तिढा निर्माण झाला होता . या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी दावा ठोकला होता . मात्र निवडणूक जवळ येत असूनही तिढा सुटत नाही हे पाहून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्वतःहून आपण या मतदारसंघातुन माघार घेत असल्याचे आज जाहीर केले आहे . त्यामुळे महायुतीमध्ये (Mahayuti) असणारा तिढा आता सुटलेला आहे .
मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी नाशिकच्या जागेबाबत बोलताना ते म्हणाले , या मतदारसंघातून उमेदवार निश्चित करण्यासाठी दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महायुतीच्या इतर प्रमुख नेत्यांची बैठकही पार पडली होती . या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. यावेळी तिथे मलाच उमेदवारी द्यावी असेही सांगण्यात आले होते . मात्र तीन आठवडे उलटून गेले तरी उमदेवार जाहीर केला नव्हता . या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी मागील तीन आठवड्यापासून फिरत आहे. त्यांचा प्रचार देखील पुढे गेला आहे . जेवढा निर्णय घ्यायला वेळ लागेल तेवढ्या अडचणी वाढणार आहेत.त्यामुळे अधिक तिढा न वाढवता मी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे मी आता महायुतीची शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मला आत्तापर्यंत ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचे आभार आहे. मोदी साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार, असेही भुजबळ यांनी सांगितले .
दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी तुम्हाला नाशिक लोकसभेच्या जागेवरुन लढण्यास सांगितले आहे, या अजितदादांच्या सांगण्यावर छगन भुजबळ यांना विश्वास बसत नव्हता. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंना फोन केल्याचे भुजबळ यांनी सांगितले. मी फडणवीसांना फोन केला आणि दिल्लीत काय घडले, याबाबत विचारले असता फडणवीसही म्हणाले की, अमित शाह यांनी तुम्हालाच नाशिकमधून लढायला सांगितले आहे.मात्र यानंतर आता आपण या उमेदवारीतून माघार घेतोय असे भुजबळ यांनी स्पष्ट सांगितले आहे .
.