राष्ट्रीय ताज्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण

जरांगे फॅक्टर रोखण्यासाठी रावसाहेब दानवेंची राज्यसभेवर वर्णी ?

X : @MilindMane70

मुंबई – लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) राज्यातील मराठवाड्यासह, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा फॅक्टरमुळे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मराठा समाजातील (Maratha community) नेत्याला बळ द्यावे लागेल, याची जाणीव भाजपा पक्षाला झाल्याने रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भाजपाने घेतला असल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली आहे.

भाजपातून राज्यसभेवर जाण्यासाठी माजी मंत्री भारती पवार (Bharati Pawar) तसेच नंदुरबारच्या पराभूत खासदार हिना गावित (Heena Gavit), दक्षिण रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष धैर्यशील मोहन पाटील, भाजपा पुरस्कृत माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या चौघांची नावे दिल्लीतील कोअर कमिटीकडे पाठवण्यात आली असल्याचे समजते.  मात्र पक्षाने मराठा आक्रमक नेतृत्व देण्याचे धोरण स्वीकारल्याने रावसाहेब दानवे यांना या निमित्ताने संधी मिळेल अशी चर्चा आहे.

साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayan Raje Bhosale) व मुंबईतून पियुष गोयल (Piyush Goyal) हे दोन्ही राज्यसभा सदस्य (Rajya Sabha members) लोकसभेवर निवडून गेल्याने या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. त्यापैकी एका जागेची मुदत ०४.०७.२०२८ पर्यंत आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar faction of NCP) गटाला देण्यात येणार आहे, तर दोन वर्ष मुदत असणाऱ्या जागेवर रावसाहेब दानवे यांचे पुनर्वसन केले जाणार आहे.

मराठवाड्यातील (Marathwada) मराठा आंदोलकांच्या तोडीस तोड नेता म्हणून रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहिले जाते. त्यासाठी रावसाहेब दानवे यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Lok Sabha election) निवडून आल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी दानवे यांना पाठविण्यात येईल. छत्रपतींचा राज्यसभेतील कार्यकाळ २. ०४.२०२६ रोजी संपेल. हा साधारण पावणे दोन वर्षाचा कार्यकाळ दानवे यांना मिळेल.

या जागेवर भाजपातून दक्षिण रायगडमधील भाजपा जिल्हाध्यक्ष व शेकापक्षातून (PWP) आमदार म्हणून दोन वेळा निवडून आलेले धैर्यशील पाटील (Dhairyasheel Patil) यांचे नाव चर्चेत होते. मात्र मराठा फॅक्टर भाजपाला मराठवाड्यातच विधानसभा निवडणुकीत चितपट करण्याची शक्यता लक्षात घेता मराठवाड्यातीलच मराठा नेतृत्व असणाऱ्या रावसाहेब दानवे यांची वर्णी लावण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.

दानवे हे गेले पस्तीस वर्ष मराठवाड्याचे नेतृत्व करीत आहेत. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कल्याणराव काळे (Kalyan Kale) यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. पराभवानंतर दानवे यांनी ते यापुढे राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद अशी कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. पक्षाने मला सरपंच व्हायला सांगितले तरी मी तयार आहे, पक्षाने मला सरपंच पदापासून आमदार, खासदार व मंत्री अशी सर्व पदे दिले असल्याने पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे, अशी प्रतिक्रिया देणाऱ्या रावसाहेब दानवे यांना पक्षाने राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

जालना जिल्ह्यातील जवखेडा गावातून रावसाहेब दानवे यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. भाजपा शाखाध्यक्ष ते तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री व्हाया ग्रामपंचायत सरपंच असा रावसाहेब दानवे यांचा राजकीय प्रवास आहे. मराठवाड्यात भाजपा पक्ष रुजवायचा असेल आणि राज्यात पुन्हा सत्तेत यायचे असेल तर मराठ्यांमधीलच आक्रमक चेहरा या अर्थाने रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहिले जाते.

मराठवाड्यातील मराठा समाजाचे दमदार नेतृत्व म्हणून रावसाहेब दानवेंकडे पाहिले जाते. मात्र मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे रावसाहेब दानवे यांना जालना लोकसभा मतदारसंघातून पराभूत व्हावे लागले. लोकसभा निवडणुकीत झालेली चूक भाजपाच्या लक्षात आली असून त्याची पुनरावृत्ती मराठवाड्यात पुन्हा झाली तर राज्यात सत्तेत येणे अवघड आहे, याची जाणीव पक्षाला झाली असावी.

दरम्यान, राज्यसभेची उमेदवारी अर्ज भरण्याचा २१ ऑगस्ट हा शेवटचा दिवस असून याबाबत अधिकृत नावाची घोषणा २० ऑगस्ट, मंगळवारपर्यंत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे