मुंबई : परळ येथील ऐतिहासिक हाफकिन इन्स्टिट्यूटची जागा विकली जाणार नाही, तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली होणार नाही, असे स्पष्ट आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी बुधवारी विधानसभेत दिले.
काशीनाथ दाते यांच्यासह सुमारे ३० सदस्यांनी राज्याच्या आरोग्य सुरक्षेशी संबंधित ही महत्त्वाची लक्षवेधी सूचना मांडली होती.
चर्चेदरम्यान काशीनाथ दाते यांनी अहमदनगर जिल्ह्यातील भेसळ प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागात सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.
आमदार अर्जुन खोतकर यांनी भेसळ करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. बालकांमध्ये वाढणाऱ्या कर्करोगामागे भेसळयुक्त अन्नपदार्थ हेही एक कारण असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विभागातील रिक्त पदे कधी भरणार, अशी विचारणा केली.
उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, १ मे ते २१ जून २०२६ या कालावधीत ११ कोटी ९३ लाख रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे. या काळात एकूण १,९३० नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
झिरवाळ यांनी सांगितले की, विभागात १९७ पदे भरून कर्मचारी कार्यरत झाले आहेत, तर अंमली पदार्थविरोधी कारवाईसाठी आवश्यक निरीक्षकांची पदे पुढील एका महिन्यात भरली जातील.
विभागाच्या मनुष्यबळाच्या गरजांकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की, अन्न व औषध प्रशासन विभागाला किमान १,१०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, तर स्वतंत्र अंमली पदार्थविरोधी यंत्रणेसाठी ४४० कर्मचाऱ्यांची गरज आहे.
विभागाकडे वाहनांची कमतरता असल्याचे नमूद करत त्यांनी, “किमान भाडेतत्त्वावर तरी वाहने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे,” अशी मागणीही सभागृहात केली.
हाफकिन इन्स्टिट्यूटबाबत बोलताना झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, संस्थेचे महत्त्व लक्षात घेता तिची जागा विकण्याचा कोणताही विचार शासनाच्या स्तरावर नाही.


Arlene Frieler
June 24, 2026Excellent blog here! Also your website loads up fast! What web host are you the usage of? Can I am getting your associate link in your host? I want my website loaded up as fast as yours lol