मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना उद्देशून फेसबुकवर केलेल्या सविस्तर पोस्टमधून राज्यातील सत्ताधारी नेतृत्वावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. भाजपच्या काही आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मौनावरही थेट प्रश्न उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, केंद्रातील भाजप नेत्यांना “सत्तेचा माज” आल्याची भावना देशभरातील नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, आता त्याच प्रवृत्तीचा संसर्ग महाराष्ट्रातही होत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची परंपरा ही संयम, सुसंस्कृतपणा आणि वैचारिकतेची होती; मात्र गेल्या काही वर्षांत ती प्रतिमा डागाळली जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे यांनी एका आमदार आणि पदाधिकाऱ्याचा उल्लेख करत, “लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही,” अशी टीका केली. अशा घटनांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सार्वजनिकपणे खेद व्यक्त न केल्यामुळे त्यांच्या संवेदनशीलतेबद्दलही प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.
“Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely” या प्रसिद्ध उक्तीचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी सध्याच्या भाजपमधील काही नेत्यांच्या वर्तनावर निशाणा साधला. “कोणालाच कोणत्याही गोष्टीची खंत किंवा खेद राहिलेला दिसत नाही आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्हीही यावर एक शब्द बोलत नाही, त्यामुळे सर्वच बेफाम झाले आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
गेली ३७ वर्षे सक्रिय राजकारणात असल्याचे नमूद करत राज ठाकरे यांनी पूर्वीच्या महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीची आठवण करून दिली. “बाळासाहेब ठाकरे असोत, शरद पवार असोत किंवा प्रमोद महाजन असोत, स्वतःच्या पक्षातील नेत्याने चूक केली तर त्यावर पांघरूण घालण्याची परंपरा महाराष्ट्रात नव्हती,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.
सध्याच्या परिस्थितीत “आपला माणूस आहे म्हणून त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष केले जात आहे,” असा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट विचारले, “तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?”
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून, चुकीचे वर्तन करणाऱ्या मंत्री, आमदार किंवा पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून आवश्यक असल्यास त्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणीही केली. “वेडंवाकडं वागणाऱ्यांवर फडणवीस कठोर शासन करतात हे एकदा दाखवून द्या, म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील,” असे त्यांनी म्हटले.
पोस्टच्या शेवटी त्यांनी, “तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत,” असे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या या फेसबुक पोस्टवर मुख्यमंत्री कार्यालय किंवा भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

