महाराष्ट्र ताज्या बातम्या

१ लाख चालक शिकले मराठी; भाषा अभियानाला मोठा प्रतिसाद, सरकारचा दावा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मराठी शिकवणी अभियानांतर्गत अमराठी व्यावसायिक चालकांना मराठी प्रशिक्षण देण्यात आले.

“मराठीचा मान राखणाऱ्याला महाराष्ट्र कवेत घेईल”; १५ ऑगस्टपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन, १७ ऑगस्टला समारोप

मुंबई : राज्यातील व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी राबविण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला’ मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा परिवहन विभागाने केला आहे. राज्यभरातील एक लाखांहून अधिक अमराठी चालकांनी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, उर्वरित चालकांनी १५ ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी केले.

“महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. मराठीचा सन्मान करणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र आपलेसे करेल,” असे सरनाईक यांनी सांगितले.

हे अभियान १ मेपासून सुरू असून त्याचा समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असून, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो चालकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मराठी अस्मितेचा संदेशही ठळक

या उपक्रमाकडे केवळ भाषा प्रशिक्षण कार्यक्रम म्हणून नव्हे, तर मराठी अस्मिता, स्थानिक सांस्कृतिक ओळख आणि समाजातील संवाद वाढविण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिले जात आहे. गेल्या काही महिन्यांत मराठी भाषा आणि स्थानिक ओळखीचा प्रश्न राज्याच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. अशा पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने या अभियानाच्या यशाची आकडेवारी जाहीर करत मराठीचा आग्रह हा सकारात्मक आणि सर्वसमावेशक असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

विशेष म्हणजे, या अभियानाला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ यांचे नाव देण्यात आल्याने शिवसेनेच्या मराठी अस्मितेशी निगडित पारंपरिक भूमिकेलाही अधोरेखित करण्यात आले आहे. त्यामुळे हा उपक्रम भाषिक प्रशिक्षणाबरोबरच मराठी अस्मितेच्या राजकीय आणि सामाजिक संदेशाचाही भाग म्हणून पाहिला जात आहे.

राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद अधिक सुलभ होईल, तसेच सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होईल, असा दावा परिवहन विभागाने केला आहे.

राजकीय विश्लेषण

मराठी भाषा हा महाराष्ट्राच्या राजकारणातील भावनिक आणि प्रभावी मुद्दा राहिला आहे. अशा परिस्थितीत एक लाख चालकांनी मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचा सरकारी दावा हा केवळ प्रशासकीय यशाचा विषय नसून, मराठी भाषेच्या सन्मानाबाबत सरकारची भूमिका अधोरेखित करण्याचाही प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे.

दुसरीकडे, विरोधक या उपक्रमाकडे मराठी भावनेचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न म्हणून पाहू शकतात. त्यामुळे या अभियानाचा परिणाम केवळ भाषा शिक्षणापुरता मर्यादित न राहता, मराठी अस्मिता आणि राज्याच्या राजकीय संवादातही त्याचे प्रतिबिंब दिसण्याची शक्यता आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात