जालना
मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करावं यासाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. काल १४ फेब्रुवारी रोजी त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर डॉक्टरांनी जरांगे पाटलांना जबरदस्तीने सलाईन लावून उपचार सुरू केले. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना भावनिक आवाहन केलं आहे.
‘मी जर मेलो तर मला असंच सरकारच्या दारात नेऊन टाका. मी मेल्यावर या सरकारला सोडू नका. येत्या १८ किंवा १९ फेब्रुवारीपर्यंत आरक्षण दिलं नाही तर आपण मुंबईला जाऊ.’ अशा शब्दात मनोज जरांगेंनी इशारा दिला आहे.
काल जरांगे पाटलांची प्रकृती ढासळल्यानंतर आंतरवाली सराटीत मराठा बांधव जमा होण्यास सुरुवात झाली होती. जरांगे पाटलांनी काही झाल्यास याला सरकार जबाबदार असल्याचं मराठा बांधवांकडून सांगण्यात येत होतं.
मनोज जरंगे पाटील यांच्या मागणीवरून सरकारने राज्यपाल रमेश बैस यांना मंगळवार, २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाची विशेष बैठक बोलावण्याची शिफारस केली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला राज्यपालांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर २० फेब्रुवारी रोजी एक दिवसीय विशेष अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे.