X : @NalavadeAnant
मुंबई: लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकत्रीतपणे सामोरे जाणार असून जागा वाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत (MVA) कोणतेही मतभेद नसून काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीतच जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, असे स्पष्टीकरण पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी गुरूवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिले.
राज्य निवड मंडळाच्या बैठकीआधी पत्रकारांशी बोलताना प्रभारी चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्रात मविआ आघाडी मजबूतच असून आम्ही एकत्रपणे निवडणुका लढवत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व मित्र पक्षांशी सातत्याने चर्चा सुरु असून वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Agahdi – VBA)) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याशीही चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP President Sharad Pawar) व शिवसेना (ऊबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेही आंबेडकर यांच्याशी चर्चा करत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सर्व मुद्द्यांवर सहमती झालेली आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असून लोणावळा येथे दोन दिवसांचे प्रशिक्षणही शिबिर झाले. या शिबिरात संघटन मजबुत करण्याविषय़ी चर्चा झाली आहे, मुंबई काँग्रेसच्या तयारीचा आढावाही घेतला जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) म्हणाले की, निवडणुका आल्यामुळे विरोधी पक्षांच्या लोकांवर सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून धाडी टाकल्या जात आहेत. परंतु भाजपाच्या एकाही भ्रष्ट नेत्यावर कारवाई केली जात नाही. आदर्श घोटाळ्याचा (Adarsh Housing Scam) उल्लेख पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) संसदेत केला व त्यानंतर अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) भाजपात घेऊन राज्यसभा खासदार केले. भाजपाने भ्रष्टाचारी लोकांना सुरक्षा कवच दिले असल्याने हे काय भ्रष्टाचारमुक्त भारत करणार? असा सवालही पटोले यांनी केला.