X: @therajkaran
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha Election) राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार गटातील निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांच्या एका ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुनील तटकरे,धनंजय मुंडेंसह अजित दादा गटातील (Ajit Pawar Group) १२ नेते भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचा दावा लोंढे यांनी केला आहे.
अतूल लोंढे यांनी एक्सवर (X) पोस्ट करत म्हटले आहे की, “धोके पे धोका….ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपाने ने ठगा नही! सुनिल तटकरे, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्री आदिती तटकरे, सुनिल शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १२ बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार!. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार! अजित दादा बहुतेक एकटेच त्यांच्या पक्षात राहणार”, असा दावा अतुल लोंढे यांनी त्यांच्या ट्विटमधून केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, काही वेळाने अतुल लोंढे यांनी आपले पहिले ट्विट डिलीट केले आणि नंतर पुन्हा नव्याने एक ट्विट करत ही सुत्रांची माहिती असल्याचे म्हटले. नव्याने केलेल्या ट्विटमध्ये लोंढे यांनीआधीच्या ट्विटमधील नेत्यांची नावे काढून टाकली. परंतु १२ बडे नेते भाजपात जाणार या दाव्यावर ते कायम आहेत. जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. यामुळे अजित पवार गटातील अनेक नेते नाराज असल्याचे दिसत आहे.