मुंबई – महाविकास आघाडीतल्या जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नाहीये. वंचितसोबत मुंबईत वरळीत फोर सिझनमध्ये झालेल्या बैठकीत जागावाटपावर तोडगा निघेल, अशी आशा होती. मात्र त्या बैठकीत फारसं काही घडलेलं नाही. अशात ९ मार्तला पुढची बैठक होणार असं सांगण्यात आलं होतं, मात्र पुढची बैठकच अद्यापपर्यंत झालेली नाही. अशात प्रकाश आंबेडकरांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून काँग्रेस आणि वंचितमध्ये जागावाटपाची बोलणी करावी, असा प्रस्ताव दिलाय.
काय लिहिलंय पत्रात
मविआच्या जागावाटपात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात १० जागांवरुन अद्यापही वाद सुरु आहे. तर मविआतील तिन्ही पक्षांत ५ जागांवरुन एकमत होत नाहीये. त्यामुळं जागावाटपाला अंतिम रुप देण्यात उशीर होतो आहे. ठाकरेंची शिवसेना १८ जागांच्या आग्रहावर अडून बसल्यामुळं आपण महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी चेन्निथला यांच्याशी संपर्क करण्याचा निर्णय घेतला. यात वंचित आणि काँग्रेसनं सगळ्या जागांवर लढण्याबाबत एकत्र बसून विचार आणि चर्चा करावी.
संजय राऊत खोटं बोलत आहेत- आंबेडकर
दुसरीकडं त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संज. राऊत हे खोटं बोलत असल्याचीही टीका केलीय. ठाकरे सेना १८ आणि काँग्रेस २० जागांवर अडून बसल्यामुळं पुढचा निर्णय होत नाहीये, असं आंबेडकरांचं म्हणणंय. वंचित समाधानी आहे, हे राऊत खोटं सांगत असल्याचंही आंबेडकर म्हणतायेत. मविआतील जागावाटपात एकही जागा मागितलेली नाही असं राऊत खोटं बोलत असल्याचा आरोप आंबेडकरांनी केलाय.
मी काय खोटं बोललो- राऊत
जागा वाटपाची चर्चा ही माध्यमांत आणि समाजमाध्यमात होत नसते. मी काय खोटं बोललो हे प्रकाश आंबेडकरांनी सांगावं, असं प्रतिआव्हान संजय राऊत यांनी दिलंय. प्रकाश आंबेडकरांची साथ मविआला हवी आहे, यात काय खोटं आहे, असा सवाल त्यांनी केलाय. वंचितला चार जागा सोडण्याची मविआची तयारी असल्याचं सांगत, या जागा आंबेडकरांनीच मागितलेल्या असल्याचंही राऊत म्हणालेत.
खोटं बोलत नसाल तर २४ तासांत
१५ जागा घोषित करा -वंचित
संजय राऊत यांनी काय खोटे बोललो हे स्पष्ट करा, असे म्हटल्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना एक्स हॅंडलवरुन पोस्ट करत आवाहन केले आहे. सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, जर तुम्ही खोटे बोलत नसाल तर येत्या २४ तासांत या १५ जागा घोषित करा. जर तुम्ही त्या १५ जागा २४ तासांत घोषित करु शकला नाही तर तुम्ही माध्यमांना दिलेली माहिती खोटी आणि अर्धवट होती हे सिद्ध होते असेही म्हटले आहे.
सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे की, संजय राऊत यांनी माध्यमांसमोर एक वक्तव्य केलं आहे. त्यात ते म्हणताहेत की, ते खोटे बोलत नाहीत. मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात माध्यमांना माहिती देताना केवळ वंचित बहुजन आघाडीमुळे हे जागावाटप रखडलेय की काय अशी माहिती दिली जाते. मात्र, प्रत्यक्षात १५ जांगावर या तिन्ही पक्षात समझोता झालेला नाही.
वंचितला बदनाम करु नका – मोकळे
वंचितमुळेच जागा वाटप रखडले असल्याचे चित्र तयार केले जात असून, याचं खापर वंचितच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे तो थांबला पाहिजे. जर तुम्ही खोटे बोलत नसाल, तर येत्या २४ तासांत या १५ जागा घोषित करा. अशी भूमिका वंचितनं घेतलेली आहे.
आंबेडकरांच्या मनात काय?
मविआसोबत जाण्याच्या मुद्द्यावर पहिल्यापासून प्रकाश आंबेडकर आणि मविआत अविश्वास दिसतोय. काँग्रेसमुळे आघाडीत स्थान मिळत नाही, अशी पहिल्यांदा टीका करणारे आंबेडकर आता काँग्रेसशीच थेट जागावाटपाची चर्चा करण्यासाठी आग्रह धरताना दिसतायेत.
वंचितनं मविात यावं यासाठी संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि शरद पवार प्रयत्न करताना दिसतायेत. तर दुसरीकडं आंबेडकरांनी सहा ते सात जागांची मागणी केली आहे.
सुरुवातीला शिवसेनेसोबत ४८ जागा लढवाव्यात अशी भूमिका वंचितनं घेतली होती. त्यानंतर आघाडीत सहभागी झाल्यानंतर १२-१२ चा फॉर्म्युला त्यांनी ठेवला होता. आता सहा ते सात जागांसाठी ते आग्रही दिसतायेत.
अशात मविआतील परस्परांमध्ये असलेल्या अविश्वासातून तिढा कसा सुटणार, असा प्रश्न विचारण्यात येतोय.
कधी सुटणार तिढा
उद्धव ठाकरे दोन दिवस दौऱ्यावर असल्यामुळं आता ते परतल्यानंतर पुन्हा एकदा मविआच्या नेत्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच हा तिढा कधी सुटणार, हे स्पष्ट होऊ शकेल.
हा तिढा सुटला नाही तर स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरण्याचा इशारा आंबेडकरांनी मविआला दिलेला आहे. त्यामुळे येत्या काळात प्रकाश आंबेडकर 48 जागी एकला चलो रे च्या भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.