पालघर – महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नसताना आता काँग्रेस नेते अधिक आक्रमक होताना दिसतायेत. सांगलीत ठाकरे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला काँग्रे,सेनं विरोध केलाय. तर भिवंडीत शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळअया मामा म्हात्रेंच्या विरोधात काँग्रेसनं उघड उघड बंड पुकारलेलं आहे. यातच आता पालघर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनीही या जागी ठाकरेंच्या शिवसेनेनं भारती कामडी यांना जाहीर केलेल्या उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त केलीय. महाविकास आघाडीतील नेते कोकणात काँग्रेस संपवण्यासाठी प्रयत्न करतायेत का, असा सवालच पालघरमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते विचारताना दिसतायेत.
कोकणात काँग्रेस संपवण्याचा ठाकरे, पवारांचा प्रयत्न?
महाविकास आघाडीतील काँग्रेसचे मित्रपक्ष कोकणातला काँग्रेस पक्ष संपवण्यासाठी प्रयत्न करतायेत का, अशी शंका काँग्रेस किसानचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांनी व्यक्त केलीय. वणव्यात किंवा अडचणीच्या काळात मित्र पाठीशी उभा राहतो, मात्र आमचे मित्रपक्ष हे कोकणातला काँग्रेस पक्ष संपवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची शंका निर्माण होत असल्याची भावना पष्टे यांनी व्यक्त केलीय. वाड्यातील पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काँग्रेसची नाराजी व्यक्त केली आहे.
भिवंडी, पालघर हे काँग्रेसचे मतदारसंघ
महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेमुळे काँग्रेसचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आगामी लोकसभेत आपले उमेदवार उभे राहतील असे मनोमन वाटत होते. लोकसभा निवडणूक जाहीर होताच महाविकास आघाडी कडून जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली. भिवंडी, पालघर ही लोकसभेवर काँगेस पक्षाकडून दावेदारी सांगण्याची चर्चा करण्यात येत होती. पालघर आणि भिवंडी या जागेवर मित्र पक्षांनी उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस पक्षांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. भिवंडी लोकसभा ही शरद पवारांकडून सुरेश म्हात्रे यांना तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडून पालघर लोकसभा ही जागा भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आली. भिवंडी आणि पालघर या जागा काँग्रेस पक्षाच्या परंपरागत जागा आहेत. तसेच राज्यातील सांगली आणि कोकण मध्ये काँग्रेस पक्ष संपविण्याचा प्रयत्न मित्र पक्षांकडून केला जातो की काय याची शंका काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
पालघरच्या जागीही मैत्रीपूर्ण लढत?
काँग्रेस पक्ष कोकणातील व भिवंडी, पालघर या जागा मैत्रीपूर्ण लढवण्याची तयारी सुरू करत असल्याचे या पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले. काँग्रेस पक्षाकडे भिवंडी आणि पालघर ठिकाणी सक्षम उमेदवार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांक विभाग उपाध्यक्ष जव्वाद हमीद चिखलेकर, काँग्रेस पालघर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मधुकर चौधरी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस योगेश नम, युवक जिल्हाध्यक्ष मुद्दसर पटेल,आदिवासी सेलचे जिल्हा अध्यक्ष बळवंत गावित,वाडा तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचाः‘विनोद तावडेंकडून फडणवीस चितपट’, खडसेंच्या घरवापसीच्या निमित्तानं काय चर्चा?