चंद्रपूर : काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या CSDS-लोकनीती सर्व्हेमधून निवडणुकीतील मतदान हे हिंदुत्व किंवा राम मंदिराच्या मुद्द्यावर होणार नसून देशातील बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर होणार असल्याचं समोर आलं आहे. तब्बल ६२ टक्के लोकांना सद्यपरिस्थिती नोकरी मिळवणं कठीण झाल्याचं वाटतंय. दरम्यान द पहिल्यांदाच मतदान करणारा तरुण कोणत्या मुद्द्यावरुन आपला उमेदवार ठरवतोय, याबाबत चर्चा करण्यात आली.
चंद्रपूरातील राणी सुधाकर मेश्राम जी यंदा पहिल्यांदाच मतदान करणार आहे. ती कोणत्या मुद्द्यावरुन मतदान करणार असल्याचं विचारण्यात आलं. यावेळी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर नापसंती व्यक्त केली. ‘भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र असं असतानाही देशाचे प्रमुख नरेंद्र मोदी हिंदुत्वाचीच बाजू का घेतात?’ असा सवाल तिने उपस्थित केला. चंद्रपूरात अनेक ठिकाणी चर्च तोडले जात आहेत, मात्र यावर कोणीच काही बोलत नाही. बजरंग दलाकडून पाद्रींवर हल्ला केला जातो. मात्र भाजपचं सरकार असल्याने पोलिसही कारवाई करायला घाबरतात. लहानपणापासून आम्हाला हिंदू-शीख भाई भाई असं शिकवलं आहे. सर्व धर्माला एकत्र घेऊन चालणं हीच भारताची भूमिका राहिली आहे. आपला धर्म कोणावरही असा अत्याचार करण्याची, दूषणं देण्याची परवानगी देतो का? असं म्हणताना तिने पाकिस्तानचं उदाहरण दिलं. धर्माच्या मुद्द्यावरुनच पाकिस्तानचं विभाजन झालं. भारतही आता त्याच मार्गाने जात असल्याचं दिसतंय, असही ती म्हणाली.
राणी पुढे म्हणाली, मणिपूरमधील महिलांवर जीवघेणा अत्याचार करण्यात आला. त्यावेळी मोदीजी कुठे होते. इतर वेळी परदेशांमध्ये प्रवास करणारे मोदीजी आपल्याच देशातील महिलांवर अत्याचार झाला तेव्हा कुठे होते? त्यावेळी राहुल गांधी मणिपूरला गेले. त्यामुळे जी व्यक्ती देशातील सर्व धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जाईल त्यालाच मतदान असं राणीने यावेळी सांगितलं. पूर्वेकडील राज्यातील तरुण मेडल घेऊन येतात तेव्हा मोदीजी त्यांचा सत्कार करतात. मात्र जेव्हा त्यांना न्यायाची गरज होती, तेव्हा ते कुठे होते? त्यामुळे मला असं वाटतं की राहुल गांधी चांगलं काम करातयेत.. माझं वोट काँग्रेसलाच जाईल.