मुंबई– राज ठाकरे महायुतीत येणार का, राज ठाकरें शिंदेंच्या शिवसेनेशी युती करणार की भाजपाशी, राज ठाकरे आणि अमित शाहा यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या विरोधात राज ठाकरे प्रचार करणार का, राज ठाकरे लोकसभा लढणार की विधानसभेत उतरणार, मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेचं वलिनीकरण होणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं राज ठाकरे येत्या ९ एप्रिलला होणाऱ्या गुढीपाडव्याच्या सभेत देणार आहेत.
९ एप्रिलला शिवतीर्थावर या, राज ठाकरेंचं आवाहन
गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता शिगेला असताना, या सभेचा टीझर रिलीज करण्यात आलाय. यात राज ठाकरेंनी स्वताच्या आवाजात ९ एप्रिलला शिवतीर्थावर या असं आवाहन मनसैनिक आणि जनतेला केलेलं आहे. नक्की काय घडतंय, काय घडलंय, हे जनतेशी प्रत्यक्ष बोलायचं आहे, असं सांगत राज ठाकरेंनी सभेला येण्याचं आवाहन केलेलं आहे.
राज ठाकरे महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची दिल्लीत राज ठाकरेंनी भेट घेतली. त्यानंतर मनसे महायुतीत येणार असल्याच्या चर्चांना तोंड फुटलंय. दक्षिण मुंबई, नाशिक, शिर्डी या लोकसभा मतदारसंघांवंर मनसेनं दावा केल्याचंही सांगण्यात येत होतं. त्यातील दक्षिण मुंबई आणि नाशिक या दोन्ही मतदारसंघात अद्याप उमेदवारांची घोषणा महायुतीनं कलेली नाही. अशात राज ठाकरे आणि प्रदेश भाजपाचे प्रभारी दिनेश शर्मा यांचीही भेट होणार असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं ९ एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.