नवी दिल्ली- देशात काँग्रेसचं सरकार आलं तर संपत्तीचं फेरवाटप करण्यात येईल, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील बंसवारा येथील प्रचारसभेत केलं. काँग्रेस सत्तेत आली तर जनतेच्या संपत्तीचं मूल्यमापन करण्यात येईल आणि ती संपत्ती घुसखोर आणि ज्यांना जास्त मुलं आहेत, त्यांच्यात वाटून देण्यात येईल, असं प्तप्रधान मोदी म्हणालेत. महिलांची मंगळसूत्रं हिसकावून घेतली जातील, अशी भीतीही पंतप्रधानांनी या भाषणात व्यक्त केली. यानंतर देशभरातून मोदी यांच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसकडून या प्रकरणाची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेली आहे.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लीमधार्जिणा- मोदी
काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लीमधार्जिणा असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी या भाषणात केलाय. संपत्तीचं फेरवाटप करण्याचं आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असल्याचं सांगत मोदींनी जनतेला साद घालण्याचा प्रयत्न केला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या २००६ सालातील राषअट्रीय विकास परिषदेतील भाषणाचा आधार यावेळी मोदींनी दिला.
काँग्रेस इंडिया आघाडीकडून सडकून टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभव स्पष्ट दिसत असल्यानं ते अशी हस्यास्पद विधानं करत असल्याची टीका आता काँग्रेस नेते करताना दिसतायेत. पहिल्या टप्प्यात मतदानाचा टक्का घसरल्यानं मोदी आणि भाजपाच्या पायाखालची वाळू सरकल्याचा आरोपही करण्यात येतोय. पंतप्रधान मोदी हे यानिमित्तानं मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका काँग्रेसचे नेते करताना दिसतायेत.
डॉ. मनमोहन सिंग नेमकं काय म्हणाले होते?
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या ज्या भाषणाचा संदर्भ मोदी देत आहेत, त्यात संपत्तीच्या फेरवाटपाचा मुद्दाच नसल्याचं काँग्रेसच्या वततीनं सांगण्यात येतंय. या भाषणात डॉ. सिंग यांनी एससी, एसटी, महिला, ओबीसी आणि मुलांच्या उन्नतीसाठी कार्यक्रम हाती घअयावा लागेल, असं सांगितलं होतं. अल्पसंख्याक विशेषता मुस्लिमांपर्यंत विकासाची फळं नेण्यासाठी उपाययोजनांची गरज त्यांनी व्यक्त केली होती. यावरुन त्यावेळी झालेल्या वादानंतर पंतप्रधान कार्यालयानं याबाबतचं स्पष्टीकरणही दिलं होतं.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात संपत्तीच्या फेरवाटपाचा उल्लेख नसल्याचा दावा करण्यात येतोय. एससी, एसटी आणि ओबीसींच्या विकासासाठी रचनात्मक प्रयत्न केले जातील असं आश्वासन देण्यात आलेलं आहे. सरकारी जमिनी आणि अतिरिक्त जमिनींचं गरिबांना वाटप केलं जाईल, असा उल्लेख काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे.