मुंबई
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत.
आज दोन्ही सभागृहाची सुरुवात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या वादग्रस्त चर्चेतून झाली. मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जीवे मारण्याचा गंभीर आरोप केला. याशिवाय त्यांनी फडणवीसांविरोधात अपशब्दांचाही वापर केला होता. यावरुन सभागृहात गोंधळ उडाला आणि पाटलांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली.
फडणवीस म्हणाले, मी मराठा समाजासाठी काय केलं हे महाराष्ट्राला माहिती आहे. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं, ते उच्च न्यायालयात टिकवलं. इतकच नाही सारथीसारखी संस्था सुरू केली. विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत, वसतिगृह, विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास मंडळाच्या माध्यमातून कर्ज देणे, विविध प्रशिक्षणाच्या योजना त्या काळात सुरू केल्या. आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्या अधिक मजबूत केल्या. त्यामुळे मराठा समाजासाठी मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. त्यामुळे जरांगे पाटील माझ्याविरोधात बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठिशी उभा राहिला. अशा प्रकारे कोणी कोणाच्या आई-बहिणींवरुन अपशब्दाचा वापर करणे योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि अपशब्द वापरायचे? मात्र तरीही माझी जरांगे पाटलांबद्दल तक्रार नाही. मात्र याच्या पाठीमागे कोण हे शोधावंच लागेल. आंदोलनाच्या नावाखाली दगडफेक करणारे सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला सांगण्यात आलं, तर याचा शोध घ्यावा लागेल.
पोलिसांच्या लाठीचार्ज करण्यापूर्वीच हे षडयंत्र सुरू झालं होतं. रात्री जाऊन मनोज जरांगेंना पुन्हा आणणारे कोण, त्यांच्या घरात जाऊन भेटणारे, बैठका घेणारे कोण आहेत याचा तपास एसआयटीमार्फत केला जाईल. आतापर्यंत मराठा समाजाने शांततेत मोर्चे केले होते. मात्र आताचं आंदोलन शांततेत नव्हतं. या आंदोलनासाठी अनेकांची घरं जाळण्यात आली, असं म्हणत फडणवीसांनी याविरोधात संताप व्यक्त केला.
पुढे फडणवीस म्हणाले, कुठल्या स्तराला आपलं राजकारण चाललं आहे. समाजाचे तुकडे करण्याचं प्रयत्न केला जात आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कुठून पैसे येतात, त्यांच्यासोबत कोण बैठका घेत आहे, यासाठी वॉररूम कुणी स्थापन केल्या होत्या याचा तपास व्हायला हवा. मला मनोज जरांगे पाटलांविषयी काही घेणं देणं नाही, मात्र त्याचा बोलविता धनी कोण याची चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल, अशा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.