उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले गुंतवणूकदार आणि पंतप्रधानांचे आभार
X : @therajkaran
मुंबई
राज्यातून उद्योग बाहेरील राज्य खासकरून गुजरातमध्ये स्थलांतरित होत असल्याचा खोटा प्रचार (False Narrative) विरोधी पक्ष करत असले आणि तसा चुकीचा नरेटिव्ह पसरवत असले तरी ताज्या आकडेवारीनुसार देशातील एकूण परकिय गुंतवणुकीच्या (FDI) ५२.४६ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. हि अत्यंत आनंदाची बातमी आहे अशा शब्दात आनंद व्यक्त करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी गुंतवणूकदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत.
एक्स या समाज माध्यमांवर (X) व्यक्त होताना फडणवीस यांनी नमूद केले आहे की, सातत्याने गेले दोन वर्ष परकीय गुंतवणूक (Foreign Direct Investment) आकर्षित करण्यात महाराष्ट्र राज्य (Maharashtra) क्रमांक एक वर राहिले आहे. आहे. “आपल्या महाराष्ट्रात सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण ७०,७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सरकारी अधिकृत आकडेवारीनुसार परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात कर्नाटकचा (Karnataka) दुसरा क्रमांक लागला आहे. या राज्यात १९,०५९ कोटी रुपये गुंतवणूक झाली. त्याखालोखाल तिसर्या क्रमांकावरील दिल्ली (Delhi) राज्यात १०,७८८ कोटी रुपये, चौथ्या क्रमांकावरील तेलंगणात ९,०२३ कोटी रुपये, पाचव्या क्रमांकावरील गुजरातमध्ये ८,५०८ कोटी रुपये, सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडूमध्ये ८,३२५ कोटी रुपये, सातव्या क्रमांकावरील हरयाणात ५८१८ कोटी रुपये, आठव्या क्रमांकावरील उत्तरप्रदेश राज्यात ३७० कोटी रुपये, तर नवव्या क्रमांकावरील राजस्थानमध्ये ३११ कोटी रुपयांची गुंतवणुक झाली आहे.
या सगळ्या राज्यात झालेल्या एकूण गुंतवणुकीची गोळाबेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले. थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही १,३४,९५९ कोटी रुपये आहे. त्यापैकी ७०,७९५ कोटी रुपये अर्थात ५२.४६ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे.
यापूर्वी सन २०२२-२३ मध्ये १,१८,४२२ कोटी रुपये (कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक), सन २०२३-२४ मध्ये १,२५,१०१ कोटी रुपये (गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात + कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक) गुंतवणूक आली होती.
राज्यात सन २०२४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत असताना एकूण ३,६२,१६१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. “अडीच वर्षांत आम्ही पाच वर्षांचे काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत ३१४,३१८ कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखविली. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे”. अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांच्या खोट्या नारेटिव्ह ची हवा काढली आहे.