मुंबई- लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन आठवडा उलटून गेला, तरी महायुतीकडून मुंबईतील केवळ दोन उमेदवारांचं नाव जाहीर झालंय. तर मविआकडून मुंबईतील एकाही उमेदवाराचं नाव जाहीर झालेलं नाही. मुंबईतील सहा जागांवर दोन्ही बाजूंनी तिढा असल्याचं दिसतंय. मनसे महायुतीत येण्याच्या चर्चेनं या तिढ्यात आणखी भर पडलीय.
सहा मतदारसंघात काय स्थिती?
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महायुती आणि मविआचं जागावाटप कसं होईल, याकडं सगळ्यांचं लक्ष आहे.
मुंबईतल्या सहा जागांपैकी काही जागांवर महायुती आणि मविआत तिढा आहे. यावर तोडगा कसा निघणार हा प्रश्न विचारण्यात येतोय.
- दक्षिण मुंबई –
१. महायुतीत अनेकांच्या नावांची चर्चा
१. सुरुवातीला भाजपाच्या मंगलप्रभात लोढांच्या नावाची चर्चा
२. नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून गाठीभेटी
३. शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरांच्या नावाचा आग्रह
४. मनसे महायुती चर्चेनंतर अमित ठाकरेंच्या नावाची शक्यता
५. शिंदेंच्या शिवसेनेच्या धनुष्य-बाण चिन्हावर बाळा नांदगावकर लढण्याची चर्चा
६. मविआकडून अरविंद सावंत यांना पुन्हा संधी, ठाकरेंकडून अधिकृत घोषणा
दक्षिण मुंबईत मविआचे अरविंद सावंत रिंगणात असतील हे स्पष्ट आहे. तर महायुतीत या जागेवर प्रामुख्यानं तिढा आहे. आता ही जागा राहुल नार्वेकर लढवणार की शिंदेंच्या शिवसेनेकडून या ठिकाणी मनसेचचे बाळा नांदगावकर रिंगणात उतरणार, हे पाहावं लागणार आहे.
- दक्षिण मध्य मुंबई
१. महायुतीकडून राहुल शेवाळे यांना पुन्हा संधीची शक्यता
२. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार शेवाळेंचा प्रचार सुरु
३. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल देसाईंचं नाव
४. काँग्रेसकडून मतदारसंघासाठी आग्रह
५. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड आग्रही
६. वंचितही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक
दक्षिण मध्य मुंबईत महायुतीचे राहुल शेवाळे यांच्यासमोर कोण लढणार हा प्रश्न आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा अनिल देसाईंच्या नावासाठी आग्रह दिसतोय. तर काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांचं नाव पुढं करण्यात येतंय. यावर तोडगा निघाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल.
- उत्तर मध्य मुंबई
१. भाजपाच्या पहिल्या यादीत उत्तर मध्य मुंबईचे नाव नाही
२. विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी दुसऱ्या चेहऱ्याची चर्चा
३. प्रिया दत्त यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारीची चर्चा
४. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांच्या नावाचीही चर्चा
५. काँग्रेसकडून स्वरा भास्कर, राज बब्बर यांच्या नावाची चर्चा
उत्तर मध्यमध्ये महायुती आणि मविआ या दोघांचेही उमेदवार अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. प्रिया दत्त विरुद्ध स्वरा भास्कर अशी सेलिब्रिटींची लढाई या मतादरसंघातून होण्याची शक्यता नाकारता येणारी नाही.
- उत्तर पश्चिम मुंबई
१. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तिकरांच्या नावाची घोषणा
२. काँग्रेसचे संजय निरुपमही या जागेसाठी आग्रही
३. विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांची माघार
- शिंदेंच्या शिवसेनेकडून गोविंदाच्या नावाची शक्यता
५. निरुपम भाजपाच्या तिकिटावर लढण्याचीही चर्चा
या मतादरसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेनं अमोल कीर्तिकरांच्या नावाची घोषणा केली अ्सली तरी संजय निरुपम काँग्रेससाठी या मतदारसंघआतून आग्रही आहेत. त्यामुळे मविआत या जागेचा तिढा आहे. दुसरीकडं महायुतीत ही जागा भाजपाकडे जाणार असल्याची चर्चा आहे. नेमका उमेदवार कोण असणार हे पहावं लागणार आहे.
- उत्तर मुंबई
- भाजपाकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी
२. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनोद घोसाळकरांच्या नावाची चर्चा - विनोद घोसाळकर यांची सून तेजस्वी घोसाळकर यांच्याही नावाची चर्चा
उत्तर मुंबईतून पियुष योगल यांची उमेदवारी जाहीर आहे. आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून कुणाच्या नावाची घोषणा होणार याकडं लक्ष आहे.
- ईशान्य मुंबई
१. महायुतीकडून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर
२. मविआकडून संजय दिना पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा
३. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांच्या नावाचीही शक्यता
हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाण्याची दाट शक्यता आहे. मिहिर कोटेचा यांच्याविरोधात कोणता उमेदवार दिला जातो हे पाहावं लागणार आहे.
सर्वात शेवटी मुंबईचा तिढा सुटणार?
मुंबई आणि ठाण्याच्या एकत्रित जागावाटपाच्या चर्चेनंतर उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.मुंबई, ठाण्यातील निवडणुका अखेरच्या टप्प्यात होणार असल्यानं दोन्ही बाजूंकडं थोडा अवधी असल्याचं दिसतंय. मनसे महायुतीत येणार का, मविआतील जागावाटपाचा तिढा सुटणार का, अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा परिणाम या जागावाटपावर होईल.
हेही वाचाःमहाविकास आघाडीचं 44 जागांचं जागावाटप पूर्ण, या चार जागांवर तिढा कायम