नवी दिल्ली– मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जेलमधून दिलेला संदेश, त्यांच्या पत्नीनं एका व्हिडीओ मेसेजद्वारे वाचून दाखवलेला आहे. पीएमएलए कोर्टानं शुक्रवारी केजरीवाल यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुानवली आहे. गुरुवारी 21 मार्चला केजरीवाल यांना दिल्ली मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक करण्यात आली होती. कोठडी सुानवल्यानंतर केजरीवाल यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आलीय.
घरचं जेवण आणि एसी रुम
ईडी कोठडीत असलेल्या केजरीवाल यांना पहिल्या दिवशी घरुन जेवणाचा डबा पाठवण्यात आला होता. आरोग्याशी संबंधित बाबींचा उल्लेख कोर्टात करण्यात आला होता, त्यानंतर केजरीवाल यांची घरातलं पथ्थ्याचं जेवण मिळावं, ही विनंती कोर्टानं मान्य केली होती. जेलमध्येही सेंट्रलाईज एसी रुममध्ये केजरीवाल यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
केजरीवाल यांचा व्हिडीओ मेसेज
शनिवारी दुपारी केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनी केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना दिलेला संदेश व्हिडीओ मेसेजद्वारे वाचून दाखवला. 3 मिनिटं 21 सेकंद असलेल्या या व्हिडीओ मेसेजमध्ये आपच्या कार्यकर्त्यांशी केजरीवाल यांनी संवाद साधलेला आहे.
काय आहे संदेश
आत्तापर्यंत मी खूप संघर्ष केलेला आहे. यापुढंही आयुष्यात मोठे संघर्ष करावे लागणार आहेत. त्यामुळं तुरुंगवासाचं मला अजिबात आश्चर्य वाटलेलं नाही. मला अटक केली म्हणून भाजपा कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा द्वेष करु नका.
आपच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची निदर्शनं
केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत आपच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची निदर्शनं पाहायला मिळालीत.
ठग सुकेशची केजरीवाल यांना चिठ्ठी
तिहार जेलमध्ये असलेल्या सुकेश यानं केजरीवाल यांना चिठ्ठी लिहिलेली आहे. त्यात डिअर ब्रदर केजरीवाल, वेलकम तू तिहार क्लब असं लिहित त्यानं केजरीवाल यांचं स्वागत केलेलं आहे. माझे तिन्ही भाऊ आता या ठिकाणी आलेले आहेत, असंही त्यानं पुढं लिहिलंय. तिहार कल्ब चालवणारे चेअरमन बिग बॉस अरविंद केजरीवाल, सीईओ मनोष सिसोदिया आणि सीओओ सत्येंद्र जैन असा उल्लेखही पत्रात करण्यात आलेला आहे.