मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असताना देखील छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) जागेवर अजूनही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. दरम्यान, मराठवाड्यात मोठी ताकद असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Eknath Shinde Shiv Sena) फक्त एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच अनेक दशकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या संभाजीनगरची जागादेखील भाजपकडेच (BJP) राहण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी भाजपचे केंद्रीय नेते अमित शाह (Amit Shah) यांनी संभाजीनगरात येऊन मोठी सभा घेतली होती. या सभेच्या रुपात भाजपने येथे चांगले शक्तीप्रदर्शन करत या जागेवर दावा केला होता. आता या जागेसाठी भाजपकडून शिंदे यांच्या शिवसेनेवर दबाव टाकला जात आहे. आम्ही केलेल्या सर्वेक्षणात ही जागा आमच्यासाठी अनुकूल आहे, असे भाजपकडून सांगितले जात आहे. एकूण आठपैकी साधारण सहा जागांवर भाजपाचे उमेवार असतील, म्हणजेच ताकद असूनही शिंदे यांच्या शिवसेनेला येथे कमी जागा मिळणार आहेत.
भाजपने याआधीच बीड, जालना, नांदेड, लातूर या जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे. म्हणजेच मराठवाड्यातील आठ पैकी चार जागांवर तर भाजपचे उमेदवार असणार हे स्पष्ट झालेले आहे. उर्वरित हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या जागांसाठीही भाजपकडून जोर लावला जातोय. हिंगोली जिल्ह्यात सध्या शिवसेनेचा खासदार आहे. त्यामुळे धाराशिव आणि परभणी या जागादेखील आम्हालाच मिळाव्यात अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे हिंगोली, धाराशीव आणि छत्रपती संभाजीनगर या जागांबाबत महायुतीत नेमका काय तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.