बीड – बीडची भाजपाची उमेदवारी पंकजा मुंडे यांना जाहीर झाल्यानंतर त्यांचा राजकीय वनवास संपला, असं मानण्यात येत होतं. मात्र पंकजा मुंडे यांनी प्रचाराला सुरुवात केल्यानंतर पहिल्याच दिवशी केलेल्या वक्तव्यांनी पंकजा मुंडेंची अस्वस्थता अद्यापही कायम आहे की काय, असा सवाल निर्माण झालाय. पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुणे, नगर, पाथर्डी यामार्गे शक्तिप्रदर्शन करत पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात प्रवेश केला. बीडमध्ये त्यांचं जोरोदार स्वागत करण्यात आलं. पुणे आणि नगरमध्येही मुरलीधर मोहोळ आणि सुजय विखे पाटील यांची भेट घेत पंकजा बीडमध्ये आल्या. या निमित्तानं केवल बीडपुरतं नेतृत्व मर्यादित नसल्याचे संकेत पंकजांनी दिल्याचं मानण्यात येतंय. पाथर्डीमध्ये केलेल्या त्यांच्या भाषणानं अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत.
खासदारकी लढवण्याची इच्छा नव्हती-पंकजा
बीड लोकसभा निवडमूक लढवण्याची इच्छा नव्हती. राज्याच्या राजकारणातच राहण्याची इ्छा होती, असं वक्तव्य जाहीरपणे पंकजांनी पाथर्डीत केलं. प्रीतम मुंडे यांच्याऐवजी लोकसभेची मिळालेली उमेदवारी ही आपल्याशी चर्चा न करता, परस्पर दिल्लीतून जाहीर झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. राज्याच्या राजकारणातून देशाच्या राजकारणात जाण्यास पंकजा मुंडे उत्सुक नाहीयेत का, असा सवाल या त्यांच्या वक्तव्यांनी निर्माण केलेला आहे.
मला कुणाचाही आशीर्वाद नाही- पंकजा
पाथर्डी बोलोताना त्यांनी सुजय विखेंना आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं. मात्र याच वेळी बोलताना पंकजांनी विखेंच्या पाठीशी आपण आहोत, मात्र आपल्याला कुणाचाच आशीर्वाद नाही, असं वक्तव्य केलंय. त्यामुळं पंकजा मुंडे बीडमधील लोकसभेच्या लढतीबाबत आणि विजयाबाबत साशंक आहेत का, असा संशयही व्यक्त होतोय.
बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी निवडणूक होणार?
पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, त्यांच्यासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे या दोन्ही मराठा चेहऱ्यांपैकी एक चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. सोनावणे यांनी २०१९ च्या निवडणुकीत प्रीतम यांच्याविरोधात ५ लाखांच्यावर मतं घेतलेली आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्रांच्या अध्यादेशाची मागणी अद्याप अपूर्ण आहे. याचे पडसाद मराठवाड्यात काही जिल्ह्यांत उमटण्याची शक्यता आहे. त्यात बीडमध्येही याचे पडसाद उमटू शकतात. अशात ही निवडणूक जातीय करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं दिसतंय. निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी झाला तर लढत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.
पंकजा मुंडेंनीही केलं भाष्य
बीडमधील लोकसभा निवडमुकीवर मराठा आंदोलोनाचा परिणाम होणार नाही, असं पंकजा मुंडेंनी वक्तव्य केलं असलं तरी दररोज आपली जात काढली जाते, हे दुर्दैवी असल्याचंही त्या म्हणाल्यात. समोर उभ्या असणाऱ्या राजकीय प्रतिस्पर्ध्याकडे जातीच्या राजकारणातून पाहत नसल्याचं सांगताना, समोरच्या उमेदवारानंही हे करु नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय.
आता या संघर्षात पुढं काय होणार हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचाःमहायुतीत 9 जागांवर अद्यापही तिढा, रामटेक, अमरावती कुणाकडे?, भाजपा प्रदेशाध्यक्षांनी काय सांगितलं?