बारामती- बारामती लोकसभा मतदारसंघातला संघर्ष तिहेरी होताना पाहायला मिळतोय. शरद पवार विरुद्ध अजित पवार या संघर्षात शिंदेंच्या शिवसेनेचे विजय शिवतारे हेही या मैदानात उतरलेले आहेत. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी बारामतीत लढत होणार हे स्पष्ट झाल्यानंतर पवार कुटुंबीयांकडून प्रचाराला सुरुवात झाली होती. मात्र त्यात शिवतारेंच्या एन्ट्रीमुळं ही लढत तिरंगी होणार असल्याचं स्पष्ट झालंय.
शिवतारे अपक्ष निवडणूक रिंगणात?
सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या सघर्षात थेट एन्ट्री घेत शिवतारे यांनी पवारांचा पराभव करण्याचा विडाच मतदारसंघात उचललेला आहे. पवार यांच्या विरोधात साडे पाच लाखांचं मतदान असून, यावेळी दोन्ही पवारांचा पराभव करण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी मतदारसंघातील पवार विरोधकांच्या गाठीभेटी घेताना ते दिसतायेत.
थोपटेनंतंर आता कुणाची भेट घेणार?
शरद पवार यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेले भओरचे आमदार संग्राम थोपटे आणि त्यांचे वडील अनंतराव थोपटे यांची काही दिवसांपूर्वी शिवतारेंनी भेट घेत, मदत करण्याचं आवाहन केलेलं आहे. त्यानंतर आता अजित पवारांचे विरोधक अशी ओळख असलेल्या इंदापूरचे भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांची ते लवकरच भेट घेणार असल्याचं सांगण्यात येतंय.
गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांचा पराभव अजित पवारांनी केला आहे. गेल्यावेळी दत्ता भरणेंच्या विजयात अजित पवारांचा मोठा वाटा होता. आता हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी याबाबत जाहीर वक्तव्य केलं होतं. अजित पवारांना लोकसभेत मदत केली तर विधानसभेत मदतीचं आश्वासन मिळआयला हवं, अशी मागणी करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरही हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची भेट घेत हा मुद्दा उपस्थित केला होता. हर्षवर्धन पाटील यांच्या नाराजीचा फायदा शिवतारेंना होईल का, हे येत्या काळात पाहावं लागणार आहे.
शिवतारेंचा प्रचार सुरु
एकनाथ शिंदे यांनी युतीधर्म पाळण्याचं आवाहन शिवतारेंना करुनही शिवतारेंनी त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. आजपासून बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांनी प्रचारही सुरु केलाय. पक्षशिस्तीपेक्षा ही निवडणूक जास्त महत्त्वाची असल्याची भूमिका शिवतारे यांनी मांडलेली आहे. त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघात दोन्ही पवारांच्या संघर्षात शिवतारेंचा फायदा होणार का, हे येत्या काळात पाहावं लागणार आहे.
हेही वाचाः‘लोकसभा निवडणूक लढवायची नव्हती, आशीर्वादाचं काय?’ उमेदवारीनंतरही पंकजा मुंडेंची अस्वस्थता कायम?