मुंबई : गेल्या महिनाभरापासून कोल्हापुर लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या जागेवरून चांगलाच चर्चेत आला आहे .अखेर जागेवरील तिढा सुटला असून शिंदे गटाचे दोन्ही खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik )आणि धैर्यशील माने(Dhairyasheel Sambhajirao Mane)यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. संजय मंडलिक यांना कोल्हापूरमधून (Kolhapur )तर माने यांना हातकणंगलेमधून (Hatkanangale)उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारीविषयी सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे .त्यामुळे कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक विरुद्ध श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) अशी लढत होईल, तर हातकणंगलेमध्ये माने विरुद्ध राजू शेट्टी (Raju Shetti) अशी लढत होणार आहे . त्यामुळे कोल्हापूरसह हातकणंगलेमध्ये काटे कि टक्कर होणार आहे .
महाविकास आघाडीकडून कोल्हापूरमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसकडून रिंगणात उतरवल्यानंतर त्यांच्याविरोधातील उमेदवार ठरत नव्हता. आता मात्र महायुतीकडून त्यांच्याविरोधात संजय मंडलिक आखाड्यात उतरणार आहेत . गेल्या काही दिवसांपासून या जागेवर भाजपकडून समरजितसिंह घाटगे यांच्या नावाचा सुद्धा समावेश होता. तर हातकणंगलेत त्या ठिकाणी राहुल आवाडे, शौमिका महाडिक आणि विनय कोरे यांच्या नावावर चर्चा होती. मात्र, माने यांनी उमेदवारीमध्ये बाजी मारली आहे. त्यामुळे कोल्हापूरसह हातकणंगलेमधील लढतीचे चित्र स्पष्ट झाल आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार आहे, तर निकाल चार जून रोजी असणार आहे . त्यामुळे या निवडणुकीत बाजी कोण मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे
दरम्यान हातकणंगलेत शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर भाजपचे मित्रपक्ष असलेले ताराराणी आघाडीचे आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे (Rahul Awade)यांनी नाराज होऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश करण्यास नकार कळविल्यानंतर, बाहेरून पाठिंबा देण्याऐवजी मशाल चिन्हावर उमेदवार देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला. त्यामुळे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माने-शेट्टी-आवाडे अशी तिरंगी लढत होणार आहे.