मुंबई- लोकसभा निवडणुका असो वा ग्रामपंचायत निवडणुका मतदारांना निरनिराळ्या प्दधतीनं आमिष, प्रलोभनं दाखवण्याचे प्रकार नेहमीच सर्रास सुरु असतात. या काळात सर्वाधिक वाटण्यात येतो तो पैसा आणि दारु. निवडणूक आयोगानं या लोकसभा निवडणुकीच्या काळात आारसंहिता लागू झाल्यापासून कठोर उपाययोजना केलेल्या दिसतायेत. ठिकठिकाणी पोलिसांची नाकेबंदी करण्यात आली असून, गाड्यांची झडती घेण्यात येतेय. निवडणुकांमध्ये वाहणारा दारुचा पूर रोखण्यात यामुळं आयोगाला काही प्रमाणात यश आल्याचं दिसतंय.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यातील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी जोरदार कारवाई केलेली दिसतेय. पहिल्या टप्प्यातील मतदानापर्यंतच राज्यात उत्पादन शुल्क विभागानं कोट्यवधींच्या दारुसह ७ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केला आहे
लोकसभा निवडणूकीत मतदारांना दारूची प्रलोभन दाखवली जातात किंवा पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. त्यावर अंकुश ठेवण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आल्याचं सांगण्यात येतंय.
३ हजारांच्यावर आरोपी गजाआड
राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचर संहिता लागू झाल्यापासून तब्बल ४ हजार २५५ गुन्हे दाखल केले आहेत तर या गुन्ह्यात ३ हजार ७५४ आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे. राज्यात आत्तापर्यंत झालेली ही कारवाई आहे, अजून चार टप्पे मतदानाचे कसे पार पडणार आणि त्यात आणखी किती जणांना बेड्या पडणआर हे पाहावं लागणार आहे.