महाराष्ट्र ताज्या बातम्या

दुष्काळावर मोदी–शिंदे तासभर चर्चा; केंद्राकडून भरीव मदतीचा उपमुख्यमंत्र्यांना विश्वास

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीतील चर्चा

“शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही” — एकनाथ शिंदे

नवी दिल्ली  : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज्यातील दुष्काळ, पाण्याची उपलब्धता, शेतीची स्थिती आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यावर दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी, दुष्काळाचे संकट मोठे असून केंद्र सरकार महाराष्ट्राला दुष्काळ निवारणासाठी भरीव मदत करेल, असा विश्वास व्यक्त केला. “दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. राज्यातील पाण्याची स्थिती, पिकांचे नुकसान तसेच जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता याबाबतही चर्चा झाली. राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी दुष्काळग्रस्त भागांना भेटी देऊन शेतकऱ्यांना मानसिक आधार दिल्याची माहिती आपण पंतप्रधानांना दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. “संकट मोठे असले तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील,” असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून वर्षाला ६,००० रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आणखी ६,००० रुपये, असे एकूण १२ हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना दिले जात असल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला. गेल्या वर्षी अतिवृष्टीच्या काळातही राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत केल्याचे सांगत, “सरकारच्या तिजोरीवर बळीराजाचा पहिला अधिकार आहे. शेतकरी संकटात असताना सरकार हात आखडता घेणार नाही,” असे ते म्हणाले.

विरोधकांवर टीका

विरोधी पक्षांकडे आता कोणतेही ठोस काम उरले नसल्याची टीकाही शिंदे यांनी केली. “मोर्चे काढणे, आंदोलने करणे आणि पंतप्रधान तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांवर आरोप करणे यातच विरोधक धन्यता मानत आहेत,” असे ते म्हणाले.

पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे?

विधान परिषद निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे यांनी निवडणूक लढवावी, याबाबत महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. “मंगेश चिवटे यांना पक्षाने एबी फॉर्म दिला असून ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करतील. सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर माघारीची प्रक्रिया होईल. या कालावधीत बरेच काही होऊ शकते. महाराष्ट्राच्या पातळीवरील विषय महाराष्ट्रातच सोडवू,” असे शिंदे म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) प्रमुख नेते असून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.

“निवडणुकीत ज्यांना लोकांनी गाडले, तेच गाडण्याची भाषा करतात”

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावरही शिंदे यांनी जोरदार टीका केली. “महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना निवडणुकीत गाडले, तेच आता दुसऱ्यांना गाडण्याची भाषा करत आहेत,” असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे नेत असून त्यांच्या पदाचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे सांगत शिंदे म्हणाले की, “पंतप्रधानांवर आरोप केला की हेडलाईन मिळते, म्हणून खालच्या पातळीवरील राजकारण केले जाते. मात्र लोकांना असे राजकारण पसंत नाही.” त्यांनी वैमानिक स्मित माच्छार यांच्या शौर्याचा उल्लेख करत, त्यांनी पंतप्रधान मोदींना प्रेरणास्थान मानल्याचे सांगितले. संकटकाळात माच्छार यांनी हनुमान चालीसा म्हटल्याचा संदर्भ देत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारवरही निशाणा साधला. “हे लोक हायकोर्टावर आरोप करतात, सुप्रीम कोर्टावर आरोप करतात. उद्या सरन्यायाधीशांचीही निवडणूक घ्या, असे म्हणायला ते कमी करणार नाहीत. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगड मारू नयेत,” असा टोला त्यांनी लगावला.

Rajkaran Bureau

About Author

1 Comment

  1. Tijuana Tatel

    October 6, 2026

    I’m really loving the theme/design of your site. Do you ever run into any internet browser compatibility issues? A couple of my blog visitors have complained about my website not working correctly in Explorer but looks great in Firefox. Do you have any solutions to help fix this issue?

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात