बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली. शरद पवार गटातूनही बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव निश्चित झालेलं आहे. अशावेळी बारामतीतील पवार विरूद्ध पवार लढत होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात असताना विजय शिवतारेंच्या एन्ट्रीमुळे नवा पेच निर्माण झाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजकीय पदार्पणात अनेक विरोधाला तोंड द्यावं लागत आहे. विशेष म्हणजे महायुतीतील घटक पक्षच ‘पवार’ यांच्या विरोधात फिल्डिंग लावत असल्याचं चित्र आहे.बारामतीवर पवार कुटुंबाचं वर्चस्व आहे. हेच वर्चस्व पुसून टाकण्यासाठी अनेक नेते कामाला लागले आहेत. यासाठी महायुतीचे नेते भेटीगाठी करीत बारामतीतून पवारांचा कंट्रोल संपवण्याचं प्लानिंग करीत आहेत. त्यामुळे सुरुवातील सहज वाटणाऱ्या बारामती मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.
बारामतीतील मतदारांना तिसरा पर्याय दिला पाहिले, यावर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत काढल्यानंतरही विजय शिवतारे बारामतीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिवतारेंनी थेट सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकला आहे. यासाठी त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पवारांविरोधात उभं राहण्यासाठी शिवतारेंनी शरद पवारांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्याकडे हात पुढे केला आहे. काँग्रेस नेते अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांच्या दुश्मनीचे किस्से राजकीय वर्तुळात प्रचलित आहे. आता विजय शिवतारेंनी थोपटेंची भेट घेतली आणि मदतीची मागणी केली. काही दिवसांआधी शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता लगेच विजय शिवतारे यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आहे. याभेटीमध्ये अनंतराव थोपटे यांनी शिवतारे यांच्या मागे उभे राहावे. मला आपला आशीर्वाद हवा असल्याचं म्हणत शिवतारे यांनी अनंतराव यांना भावनिक साद घातली आहे. एकीकडे पवारांची सुन लढतीये, तर दुसरीकडे पवारांची लेक, तर शिवतारे देखील मैदानात आले आहेत. त्यामुळे आता कोणाला पाठिंबा देयचाय, यावर आम्ही विचार केला नाहीये, असं अनंतराव थोपटे यांनी म्हटलं आहे.
भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. सर्वच घटक पक्षांनी महायुतीचा धर्म पाळणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जाहीरपणे आपल्याला धमक्या मिळतात, हे चुकीचं असल्याचं सांगत पाटलांनी नाराजी व्यक्त केली होती. बारामती लोकसभेसाठी भाजपकडूनही रणनीती आखली जात आहे. त्यामुळे बारामती लोकसभेत नेमकी लढत कोणात होणार, हे काही दिवसात स्पष्ट होईल.