मुंबई– अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीवरुन राणा आणि अडसूळ पिता-पुत्रांमध्ये जुंपलेली आहे. नवनीत राणा भाजपात प्रवेश करतील आणि त्यांना भाजपाकडून तिकिट देण्यात येईल अशी चर्चा आहे. शिंदे शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ, पुत्र अभिजीत अडसूळ यांनी राणा यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे. स्थानिक भाजपा पदाधिकारीही राणा यांच्यावर नाराज असल्याचं सांगण्यात येतंय. अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातही नेहमीच वाकयुद्ध रंगलेलं असतं. या स्थितीत लोकसभा निवडणुकांच्या आधी शहरात लागेलेले बॅनर्स चर्चेचा विषय ठरतायेत.
काय आहेत बॅनर्स ?
अमरावती शहरात राजापेठ चौकात खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात बॅनरबाजी दिसते आहे. या बॅनरवर
‘मोदीजी आपसे बैर नाही, राणा तेरी खैर नही, अशा आशयाचे बॅनर्स दिसतायेत. या बॅनरवर कुणाचंही नाव लिहिण्यात आलेलं नाही. मी अमरावतीकर असं या बॅनर्सखाली लिहिलेलं आहे. दुसरीकडे शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या प्रचाराचेही बॅनर व्हायरल होतायेत.
राणा विरुद्ध अडसूळ संघर्ष
हे बॅनर कुणी लावलेत, याचा शोध आता घेण्यात येतो आहे. आनंदराव अडसूळ यांचा पराभव करुन २०१९ साली राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं नवनीत राणा खासदार झाल्या. मात्र त्यानंतर अडसूळ यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिलाय. आता या प्रकरणाचा निकाल कधीही लागू शकतो. अशात राणा यांचं जात प्रमाणपत्र बोगस ठरल्यास त्या निवडणुका लढवू शकतील का, याबाबत साशंकता आहे. ही जागा आपल्यालाच मिळावी, अशी मागणी अडसूळ यांची आहे. आता महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
हेही वाचाःदक्षिण मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार द्या, पदाधिकाऱ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र