मुंबई – भारत न्याय यात्रेचा ६२ दिवसांचा प्रवास करुन, राहुल गांधी आज मुंबईत पोहचतील. मणिपूरहून निघालेली ही यात्रा १४ राज्यांच्या प्रवास करुन मुंबईत दाखल होतेय. आज राहुल गांधी चैत्यभूमीवर जाणार आहेत. रविवारी शिवाजी पार्कात राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची समारोपाची सभा ऐतिहासिक होण्याची शक्यता आहे. या सभेत इंडिया आघाड़ीची एकजूट पाहायला मिळेल. इंडिया आघाडीतील १५ मित्रपक्षांचे मोठे नेते या सभेत सहभागी होतील. आचारसंहिता लागू झाल्यानंतर होणाऱ्या या बैठकीत इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटण्याची शक्यता आहे. तसचं इंडिया आघाडीच्या नेत्यांची एक बैठकही होणार असल्याचं सांगण्यात येतंय.
मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र
महाराष्ट्रात आलेली राहुल गांधी यांची यात्रा नंदूरबार, मालेगाव, नाशिक, पालघर जिल्ह्यातून भिवंडी, ठाण्यातून मुंबईत दाखल झालीये. राहुल गांधी यांच्या या यात्रेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. राहुल गांधीही आदिवसी, तरुण, महिला, अल्पसंख्याकांचे प्रश्न मांडत, मोदी सरकारच्या विरोधात रान उठवताना दिसतायेत.
मोदी सरकार हे उद्योगपतींचं सरकार असल्याची टीका करत, बेरोजगारी, नोकऱ्या, महिला गॅरंटी, जातीनिहाय जनगणना यासारखे मुद्दे राहुल गांधी यांच्या अजेंड्यावर दिसतायेत. इलेक्टोरल बाँडवरुनही राहुल गांधी आक्रमक झालेले दिसतायेत. भाजपानं केलेलं हे जगातील सर्वात मोठं खंडणीचं रॅकेट असल्याची टीका ते करतायेत.
इंडियाच्या सभेला कुणाची उपस्थिती
राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेच्या या समारोपाची सभा ऐतिहासिक होण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी होणाऱ्या या सभेत इंडिया आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ होईल असं सांगण्यात येतंय. या सभेला इंडिया आघाडीतील १५ प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.
सभेला कुणाकुणाची उपस्थिती?
१. राहुल गांधी
२. शरद पवार
३. उद्धव ठाकरे
४. अखिलेश यादव
५. तेजस्वी यादव
६. एम के स्टॅलिन
मुंबईतून मोदींना आव्हान
मुंबईसारख्या मोठ्या शहरातून पंतप्रधान मोदी आणि भाजपाला आव्हान देतील. या सभेत मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात येईल. ही सभा महाराष्ट्रातील ऐतिहासिक सभांपैकी एक असेल असा दावा काँग्रेस नेते करतायेत. राहुल गांधी मुंबईत येत असतानाच आचारसंहिता लागू होतेय. आचारसंहित लागू झाल्यानंतर ही सभा होणार असल्यानं या सभेचा खर्च पक्षाच्या खर्चात जाणार आहे. मविआचं जागावाटप, राहुल गांधींची सभा यामुळं मविआचा प्रचार रविवारच्या सभेनंतर जोरदार सुरु होईल, असं दिसतंय. लोकसभेच्या संग्रामाची सुरुवात रविवारच्या या सभेपासून होईल.
हेही वाचाः ‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही’, अमरावतीत लागलेले बॅनर्स ठरतायेत चर्चेचा विषय