रत्नागिरी- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघआतून नारायण राणे हे भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. तर किरण सामंत यांनी माघार घेतल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलंय. महायुतीतला हा तिढा सामंजस्यानं सुटला असला तरी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी कुणाला मिळणार, याचा सस्पेन्स मात्र गेले काही दिवस सुरु होता. रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपानं आपल्या गळाला लावून घेतल्याचं दिसतंय.
किरण सामंत यांना विधान परिषदेची संधी
किरण सामंत यांना माघार घेतल्यानंतर विधान परिषदेत संधी दिली जाण्याची शक्यता आहे. किरण सामंत यांनी उमेदवारी मिळावी यासाठी गेले काही महिने सातत्यानं प्रयत्न केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीही त्यांनी घेतल्या होत्या. मात्र भाजपा श्रेष्ठींचा राणेंच्या नावासाठी आग्रह असल्यानं सामंत यांना अखेर माघार घ्यावी लागली आहे.
राणे विरुद्ध विनायक राऊत लढत
२०१४ विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नारायण राणे पहिल्यांदाच थेट लोकसभेच्या रिंगणात दिसणार आहेत. त्यांनी यापूर्वीच मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केलेली आहे. २०१९ साली विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा पराभव केलेला होता. मात्र पाच वर्षांत राजकीय परिस्थिती बरीच बदललेली आहे. अशात राणे विरुद्ध राऊत ही लढत चुरशीची होणार आहे. नारायण राणे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.
हेही वाचाःभगीरथ भालकेंचा पाठिंबा प्रणिती शिंदेंना, सोलापुरात राम सातपुतेंची वाट बिकट?