X : @NalavadeAnant
मुंबई: महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार व ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे जागावाटपात आपल्याला धोका देत आहेत असा ग्रह झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी एक पत्रक काढत ठाकरे, पवार यांनी विश्वास गमावल्याची टिका करत थेट मविआतून बाहेर पडल्याचे जाहीर केले. मात्र काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या सात जागांवर पाठिंबा देण्याची तयारीही दर्शविली.
खरंतर रविवारी शिवाजी पार्कवर पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या सभेलाही त्यांनी आघाडी धर्माचे पालन करत केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली होती. खुद्द काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्याच उपस्थितीत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतल्याने आंबेडकर यांचा आघाडीतील समावेशही जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र आघाडीतील महत्त्वाचे दोन प्रमुख नेते उध्दव ठाकरे व शरद पवार हे आंबेडकर यांना वगळून जागावाटपाच्या चर्चा करत आहेत, हे अनुभवल्याने संतापलेल्या आंबेडकर यांनीही आजच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना खरमरीत पत्र लिहून ते एक्स या समाज माध्यमातुन प्रसिद्ध केले. या पत्रात त्यांनी ठाकरे व पवार यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला. जागावाटपाच्या चर्चेत या दोन नेत्यांनी आमच्या प्रतिनिधींचे न ऐकता जी असमान वागणूक दिली त्यावरून आमचाही या दोन नेत्यांवरचा विश्वास उडाल्याचे सांगत तीव्र खंत व्यक्त केली.
“१७ मार्चच्या मुंबईतील ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या समारोपाच्या सभेत तुम्हाला आणि राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. आपण विस्तृत संभाषण करू शकलो नाही आणि म्हणूनच आज मी तुम्हाला पत्र लिहित आहे. लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता सातत्याने बैठका घेत आहे,” अशी तक्रारही आंबेडकर यांनी पत्रात केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा- फॅसिस्ट, फुटीरतावादी, लोकशाहीविरोधी भाजप-आरएसएस सरकारला पराभूत करणे हा आहे. या विचाराने मी महाराष्ट्रातील सात जागांवर काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या पसंतीच्या या सात जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना आमचा पक्ष पूर्णपणे पाठिंबा देईल, अशी ग्वाही आंबेडकर यांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छांचाच नाही, तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा हात देणाराही आहे, असेही आंबेडकर यांनी पत्रात स्पष्टपणे नमुद केले आहे.