नवी दिल्ली – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हेही उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतर राज ठाकरे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर या भेटीबाबत आणि महायुतीत सहभागी होण्याबाबत निर्णय ते जाहीर करण्याची शक्यता आहे.
विनोद तावडेंशीही चर्चा
या भेटीपूर्वी राज ठाकरे यांची भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीही भेट घेतली. आता राज ठाकरे मुंबईत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्रित काय घोषणा करणार याकडे सगळ्याचं लक्ष आहे.
मुंबईत भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक
राज ठाकरेंची अमित शाहा यांची भेट होत असताना, मुंबई भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत सहाही जागा जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. तसचं राज ठाकरे महायुतीत येत असल्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस जाहीर करतील, असे संकेतही देण्यात आलेत.
महायुतीकडे अनेक नेते येत असताना इंडिया आघाडी सोडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचीची टीकाही यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलीय.