मुंबई- महायुतीत अद्यापही जागावाटटपाचा तिढा सुटलेला दिसत नाहीये. अद्यापही दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण आणि नाशिक या सात मतदारसंघातील उमेदवार जाहीर झालेले नाहीत. अशात राज्यात १६ जागा शिंदेंची शिवसेना लढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय. आत्तापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेचे १० उमेदवार जाहीर झाले आहेत. या सातपैकी सहा जागी शिंदेंची शिवसेना लढणार हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आता चार जागांवरच समाधान मानावं लागेल असं दिसतंय.
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा
छत्रपती उदयनराजे यांनी घेतलेल्या आग्रही भूमिकेमुळं साताऱ्याची लोकसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भाजपाला देण्यात आलीय. छत्रपती उदयनराजे हे राज्यसभेवर असतानाही, त्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे. त्यांच्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. ही हक्काची जागा सोडल्यानं आता अजित पवार यांना राज्यसभेची एक जागा देण्यात येणार आहे. केंद्रीय वाणिज्य् मंत्री पियुष गोयल हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आहेत. त्यांची राज्यसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे. प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिलीय.
लोकसभेसाठी भाजपाला सर्वाधिक जागा
शिंदेंच्या शिवसेनेला १६ जागा, भाजपाला २८ जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४ जागा असा फॉर्म्युला सध्या दिसतो आहे. मात्र नाशिक, ठाणे आणि दक्षिण मुंबईचा वाद अद्यापही कायम आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दावा केल्याप्रमाणे त्यांना खरंच १६ जागा मिळणार का हे पाहावं लागणार आहे.