मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी निश्चित मानण्यात आली असून आता त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडून (Sharad Pawar)त्यांचे निष्ठावंत शिलेदार आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde ) यांच्यावरच ही जबाबदारी दिली जाणार असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे सातारच्या रिंगणात उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे मुकाबला रंगणार का? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहचली आहे .
या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर, सुनील माने अशी नावे चर्चेत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार बाळासाहेब पाटील यांनी निवडणूक लढवण्यासाठी नकार दिला . त्यानंतर थेट माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनाच तुतारीच्या चिन्हावर लढवण्यासाठी गळ घातली होती. मात्र, त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली मात्र तुतारी चिन्हावर लढणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेर पवारांचे निष्ठावंत शिलेदार शशिकांत शिंदे रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चाना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे . शशिकांत शिंदे यांनी आदेश आल्यास निवडणुकीसाठी तयारी दर्शवल्याचे समजते. दरम्यान, जयंत पाटलांनी शशिकांत शिंदे यांना तुम्हाला निवडणूक लढावी लागेल, असा निरोप दिल्याचे सुद्धा समजते. त्यामुळ अशी सुद्धा चर्चा आहे.
याआधी विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते श्रीनिवास पाटील (MP Srinivas Patil) यांनी लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Election 2024) माघार घेतली . प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली होती .दरम्यान आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागेबाबत मुंबईमध्ये बैठक होणार आहे . यामध्ये सातारच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत आज सातारच्या जागेवर सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आज तरी सातारच्या जागेची घोषणा होणार का? याकडे आता सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.