नवी दिल्ली – महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर अपेक्षेप्रमाणे दिल्लीत भाजपा पक्षश्रेष्ठींच्या समोर सुटल्याचं सांगण्यात येतंय. महाराष्ट्रात भाजपा लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढणार, हे स्पष्ट झालेलं आहे. भाजपा ३४, शिंदे शिवसेना १० आणि अजित पवार राष्ट्रवादी ४ जागा लढण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येतंय. शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीत अमित शाहा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत अमित शाहा यांची बैठक पार पडली. यात या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. एक-दोन जागांवर तिढा आहे, मात्र त्याबाबत स्थानिक पातळीवर चर्चा करुन मार्ग काढावा, असं अमित शाहा यांनी सुचवलेलं आहे.
मुख्यमंत्री शिंदेंना महत्त्वाचा सल्ला
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे १३ खासदार सद्यस्थितीत आहेत. त्यांना १०च जागा मिळणार असल्यानं त्यांचं या जागावाटपात अधिक नुकासन होणार असल्याची चर्चा आहे. यातच शिंदेंच्या उर्वरित १० पैकी काही खासदारांचीही तिकिटं कापली जातील असंही सांगण्यात येतंय. शिंदेंच्या शिवसेनेचे काही खासदार बदलण्याचा सल्ला अमित शाहांनी शिंदेंना या बैठकीत दिल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपाप्रमाणेच शिंदेंच्या शिवसेनेतही उमेदवारांच्या चेहऱ्यात बरेच बदल येत्या काळात दिसण्याची शक्यता आहे.
अजित पवार गाटाला केवळ ४ जागा
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने १० जागांची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात ज्या ठिकाणी निवडून येण्य़ाची क्षमता आहे, त्याच जागा लढवाव्यात, असा आग्रह भाजपातून धरल्याचं दिसतंय. त्यातून अजित पवार यांच्या वाट्याला बारानती, शिरुर, रायगड आणि परभणी हे मतदारसंघ आल्याची माहिती आहे..
शिंदे आणि पवारांच्या समर्थकांत चलबिचल
शिंदे आणि पवारांना जागावाटपात मिळालेल्या कमी जागांचा परिणाम त्यांच्या समर्थकांवर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जागावाटपाच्या मुद्द्यावर फारसे आक्रमक बोलत नाहीयेत, असा सूर त्यांच्याच पक्षातून ऐकू येताना दिसतोय. तर अजित पवारांच्या वाट्यालाही चार जागा आल्यास त्यांचेही समर्थक नाराज होण्याची शक्यता आहे. अशात आता या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे.
हेही वाचाःउद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम