मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar)पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या दुसऱ्या यादीत रावेर (Raver), भिवंडी (Bhiwandi), बीड (Beed), माढा (Madha) आणि सातारा (Satara) या पाच जागांचे उमेदवार जाहीर होणार आहेत . त्यामुळे या मतदारसंघात कोणाकोणाला उमेदवारी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले .
दरम्यान काही दिवसांपूर्वी सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil )यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची हा पेच निर्माण झाला आहे . मात्र आता एकीकडे श्रीनिवास पाटलांची मनधरणी सुरू असून दुसरीकडे जर श्रीनिवास पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहिले, तर मात्र लोकसभेला कोणाला रिंगणात उतरवायचं? याची चाचपणी शरद पवार गटाकडून सुरू आहे. महायुतीविरोधात श्रीनिवास पाटील हेच चांगला लढा देऊ शकतील अशी वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे .
याआधी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके, वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्करराव भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आता दुसऱ्या यादीत कोण रिंगणात असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
दुसरीकडे सातारा लोकसभेच्या रिंगणात खासदार शरद पवार कोणाचे नाव अंतिम करणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. पवारांचे निष्ठावंत शिलेदार आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde)यांच्यावरचही जबाबदारी दिली जाणार असल्याचं समोर येत आहे. त्यांनी होकार कळविला नसला तरी याबाबतच्या घोषणेची केवळ औपचारिकता असल्याचे राष्ट्रवादीतील संपर्क सुत्रांकडून सांगितले जात आहे.