मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदारसंघात राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . या मतदारसंघातील माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी काही दिवसांपूर्वीच नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याच बोललं जात असतानाच आता उत्तम जानकर यांनी राजकारणातले वस्ताद शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे . उद्याच्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्या ते आपला निर्णय जाहीर करत तुतारी हाती घेणार आहेत . तसेच उद्या ते जयंत पाटील , जयसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार याना साथ देण्याची घोषणा करणार असल्याचे निश्चित झाले आहे त्यामुळे माढ्यातील शरद पवारांच्या खेळीमुळे भाजपचा डाव फिस्कटणार आहे .
लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना कोणत्याही परिस्थितीत माढ्यात विजयाचा झेंडा फडकवायचाच, असा निर्धार खुद्द शरद पवार यांनी केला होता . त्यासाठी पहिल्यादा धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil)यांना सोबत घेऊन उमेदवारी देत भाजपला मोठा धक्का दिला. आता या मतदारसंघात अधिकाधिक मते कसे जुळवता येतील, यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठीच करमाळ्याचे नारायण पाटील (Narayan Patil )यांच्यासह फलटणचे रघुनाथराजे निंबाळकर (Raghunathraje Nimbalkar )यांनाही सोबत घेतले. आता त्यांनी माळशिरसच्या भाजप नेते उत्तम जानकर यांनाही आपल्या राष्ट्रवादीत सामील करून घेण्याचा निर्णय घेतला .जानकर यांनी थेट शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे उत्तम जानकर हे उद्याच्या मेळाव्यात ही भूमिका जाहीर करणार असले तरी त्यांच्या निकटवर्तीयांनी मात्र आमचे तुतारी हाती घ्यायचे ठरले आहे असे सांगत लोकसभेला मोहिते पाटील आणि विधानसभेला उत्तम जानकर हे सूत्र या मेळाव्यात समोर येणार असल्याची समोर आली आहे .
दरम्यान उत्तम जानकर यांच्या या घटनेमुळे भाजपच्या माढ्यातील अडचणी वाढणार असून शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस याना धोबी पछाड दिल्याचेही दिसणार आहे. तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात येण्याच्यात्यांच्या या निर्णयाचा माढा लोकसभेच्या निर्णयावर परिणाम दिसू शकतो. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं उत्तम जानकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.